- ओंकार करंबेळकर
तांबडय़ा रंगाच्या कागदांवर किंवा गेरूनं रंगवलेल्या भिंतींवरील वारली चित्रं आपण सर्वानी पाहिलीच आहेत. डहाणूजवळ राहाणार्या पद्मश्री जिव्या सोमा मशे यांनी वारली चित्रकला सर्व जगाच्या समोर आणली. इतकी वर्षे केवळ वारली समुदायापुरती मर्यादित असणारी ही कला त्यांनी नावारूपाला आणली. या चित्रांमुळे केवळ मशे यांचंच नाही तर भारताच्या एका आदिम चित्रकलेचं नाव जगभरात गेलं. गेल्याच महिन्यात 15 मे रोजी जिव्या सोमा मशे यांचं वृद्धापकाळानं निधन झालं. सलग 65 वर्षे त्यांनी वारली चित्रकलेची सेवा केली आणि लाखो चित्रकारांना प्रेरणा दिली. आदिवासी समुदायांच्या कलेला सन्मान मिळवून दिलाच त्याहून परदेशातही शिष्य निर्माण केले. हे सर्व लोक जगभरात वारली चित्रांची निर्मिती करत आहेत. जिव्या सोमा मशे यांची चित्रकला महाराष्ट्रापाठोपाठ देशभर पसरल्यावर भारत सरकारतर्फे त्यांना जर्मनीला जाण्याची संधी मिळाली होती. त्यानंतर त्यांनी अमेरिका, रशिया, जपान, इंग्लंड, इटली, फ्रान्स अशा विविध देशांमध्ये जाऊनही वारली चित्रकलेचे धडे दिले होते. सदाशिव आणि बाळू हे त्यांचे पुत्रही विविध देशांमध्ये वारलीचं प्रशिक्षण देऊन आले आहेत. सुदैवाने वारली चित्रकलेचं हे बीज मशे यांच्या तिसर्या पिढीतही रुजलं आहे. जिव्या सोमा मशे यांचा नातू प्रवीण. त्याला वारली कलेचं बाळकडू घरातूनच मिळालं. आजोबा आणि वडिलांना चित्र काढताना पाहातच तो मोठा झाला. त्यांच्याबरोबर त्याला विविध प्रशिक्षण केंद्रांमध्ये जाण्याची संधी मिळाली. आजोबा आणि बाबांबरोबर आयआयटी पवई येथे त्यानं वारली चित्रकलेचं पाच दिवसांचं प्रशिक्षण दिलं होतं. दिल्लीमध्ये भाऊ विजयबरोबर दिल्ली पब्लिक स्कूल येथे मुलांना वारली चित्रकला शिकवण्याची संधी त्याला मिळाली होती. आजोबांप्रमाणे प्रवीणची चित्रंही विशेष प्रसिद्ध आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी चित्र शिकवण्यासाठी, कार्यशाळेत सहभाग घेण्यासाठी त्याला आमंत्रण येतात. डहाणू स्टेशनवर आपण उतरताच डहाणूतील वारली चित्रकलेने रंगलेल्या भिंती आपलं स्वागत करतात. ही चित्रं काढण्यामध्ये प्रवीणचाही सहभाग आहे. डहाणूला येणार्या प्रत्येक उतारूला वारली चित्रकलेचं दर्शन त्याच्या चित्रांमुळे शक्य झालं आहे.फ्रान्समध्ये इन्स्टिटय़ूट ऑफ ह्युमन स्टडिजचे संचालक असणारे सर्जे ले ग्युरिएक यांनी प्रवीणची चित्रकला पाहिली होती. सर्जे ले गेली आठ वर्षे प्रवीण आणि त्याच्या आजोबांना भेटायला भारतात येत असत. डहाणूला वारली चित्रकला पाहिल्यावरच त्यांच्या मनात वारली संस्कृतीबद्दल आत्मीयता निर्माण झाली होती. जिव्या सोमा मशे यांच्या कलेबद्दल त्यांना भरपूर कौतुक वाटत असे. मागच्या वर्षी उन्हाळ्यात जिव्या यांच्या चित्रांचे पॅरिसमध्ये प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. या प्रदर्शनासाठीही सर्जे यांनी विशेष प्रयत्न केले होते. त्यांच्या पुढच्या पिढय़ा तितक्याच जोमाने कलेचा प्रसार करत असल्याचं पाहून त्यांनी प्रवीणला फ्रेंच शाळांमध्ये मुलांना शिकवण्यासाठी फ्रान्सभेटीचे आमंत्रण दिले. सध्या प्रवीण फ्रान्समध्ये पॅरिस आणि ब्रिटनी येथील मुलांना वारली चित्रकला शिकवत आहे. क्रोढोन, सिझुन आणि रॉस्नेन या ब्रिटनीतील तीन शाळांमध्ये सुमारे महिनाभराचं हे प्रशिक्षण सुरू आहे.