गणेश पुंड
वन वे तिकीट. इच्छा-आकांक्षांचं जगण्याचं आणि मग सवयीचं. पोटाची भ्रांत पडेल इतकाच जमिनीचा तुकडा आणि चार भावंडं, बापाची मुलांना शिकवण्याची जिद्द, त्याचे पाय कर्जाच्या चिखलात दिवसेंदिवस रुतत गेले. सगळ्यात मोठा मुलगा गजानन इंजिनिअर झाला. खरी समस्या इथून सुरू झाली. हिंगोली जिल्ह्यातील लहान खेडय़ातून पुण्यात शिक्षणासाठी आलेला गजानन इंजिनिअर झाला. मात्र अनुभव नाही म्हणून नोकरी लागेना. दिवसेंदिवस खेटे मारून घासत चाललेले जोडे शिवायलाही जवळ पैसे उरले नाहीत. जोडीला पदरी पडलेली निराशा आणि कर्जात बुडालेल्या बापाची इंजिनिअर मुलाकडून लागलेली आर्थिक मदतीची आशा, हे गजाननच्या सहनशीलतेचा अंत पाहत होतं. देणेकरी पैशासाठी बापाच्या दारावर सतत येऊ लागले.अशा परिस्थितीत भावाच्या पावलांवर पाऊल ठेवत इंजिनिअरिंगला अॅडमिशन मिळवणारा धाकटा सुनील नाशिकच्या संदीप फाउण्डेशनमधून दुसर्या वर्षाला शिक्षण घेत होता. भावाची नोकरीसाठी होणारी वणवण सुनीलला कळू लागली. एवढं शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नाही हे कळल्यावर त्याच्या मनावर त्याचा उलट परिणाम झाला. अखेर बापाच्या जिद्दीपुढे त्यानं इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं. गजाननही तोर्पयत एका प्लेसमेंटला पहिला पगार फी स्वरूपात भरण्याच्या बोलीवर आठ हजार रुपये महिना वेतनावर एका नोकरीत रुजू झाला. पण आठ हजार रुपयांमध्ये त्याचंच भागेना. शेवटी वडिलांनी त्याच्याकडून काही मदत होईल ही आशाच सोडली.तीन नंबरचा मुलगा ज्ञानेश्वर आर्थिक अडचणींमुळे शिक्षणापासून आधीच दूर झाला होता. कंपनीत काम करून त्यानं काही दिवस गुजराण केली. दरम्यान त्यानं मोठय़ा भावांच्या आधीच लग्न केलं आणि आता पुण्यात बायकोबरोबर स्वतंत्र राहतो आहे.सगळ्यात लहान चार नंबरच्या रामेश्वरनं नाशिक शहरात काम करून बी.कॉमची पदवी पूर्ण केली. तो आता एका नामांकित हॉटेलमध्ये स्टोअर सहाय्यक म्हणून काम करतो आहे. सुनील त्याच्यासोबत राहून स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविण्याच्या प्रयत्नात गुंतलेला आहे. सहज नोकरी त्याला मिळाली नाही व त्यानं ती करण्याचा हट्टही सोडून दिला.कर्जात बुडालेल्या बापानं कर्जाचं ओझं कमी व्हावं या हेतूने गजाननचं लग्न लावून दिलं व मिळालेल्या हुंडय़ाच्या पैशातून त्याच्या शिक्षणासाठी काढलेल्या कर्जाची काही रक्कम परत केली. गजाननही आता स्वतंत्र त्याच्या बायकोसोबत पुण्यानजीक तळेगाव येथे राहतो आहे.मुलांचं शिक्षण आपली परिस्थिती बदलू शकते असा विचार करणारा बाप. त्याच्या हाताला मात्र काहीच लागलं नाही. सगळी मुलं तुटली. तरीही माझ्या मुलांना माझ्यासारखी लाचार शेती करावी लागणार नाही हे अभिमानाने सांगणारा बाप, आता मुलांच्या जगात कुठेच दिसत नाही.आता गावाकडं जाणं होत नाही, अर्धा एकर जमिनीच्या तुकडय़ावर राबणारे आई-बाप कष्टानं खातात, कधीतरी गावाकडे चुकून आलेली मुलं प्रखर उन्हानं होरपळून जातात. गरम होणारी पत्र्याची खोपटी त्यांना असह्य वाटते. लोडशेडिंगच्या अंधारात मोबाइलदेखील चाजिर्ग होत नाही म्हणून मुलं वैतागतात. विहिरीचं तळाशी गेलेलं गढूळ पाणी प्याल्यानं ती लगेच आजारी पडतात. ही या शहरांची देण आहे. जिथं चोवीस तास वीज, शुद्ध पाणी, स्लॅबची घर आणि वाहतूक सुविधा. पाखरं जेव्हा घरटी सोडून उडतात तेव्हा ही शहरे त्यांना आधार देतात. पोटाला काम देतात. एकीकडे शहरं समृद्ध होतात तशी दुसरीकडे गावं उजाड होताना मला दिसतात.अशीच असंख्य वन वे तिकीटवाली माणसं रोज शहराच्या दिशेने येत आहेत. त्याची स्वप्नबीजं घेऊन शहरातल्या मातीत अंकुरण्यासाठी..