पाऊस आता जोरदार लागलाय. रस्त्यांना खड्डेही पडलेत. त्या खड्डय़ांनी कित्येकांचे बळी घेतले. रस्ते अपघातात बळी जाणार्यांची, जखमी होणार्यांची संख्या बरीच आहे. सरकार, व्यवस्था या सगळ्यांना दोष देता येईलही; पण त्यामुळे आपला प्रश्न सुटणार नाही. प्रश्न हाच आहे की, पावसात आपण गाडी सांभाळून चालवणार का? आपली बाईक मान्सून रेडी आहे का? म्हणजेच आपण आपल्या वाहनाची काळजी घेतोय का, त्यावर माया करतोय का? बेदरकारपणे गाडी हाकत निघणं भरपावसात किती धोक्याचं ठरू शकतं, याची कल्पनाही न केलेली बरी.त्यामुळेच ही यादी हाताशी ठेवा आणि विचारा स्वतर्लाच की, आपली बाइक मान्सूनसाठी सज्ज आणि सुरक्षित आहे का?
1. ब्रेक लागताहेत का?पाऊस सुरू होण्यापूर्वी आपल्या गाडीचे ब्रेक तपासून घेतलेत का? ब्रेक वायर बदलल्या आहेत का? अनेकजण तर आपल्या गाडीचा ब्रेक लागत नाही तरी आपला गाडीवर कण्ट्रोल आहे असं फुशारक्या मारत सांगतात. पण हा जिवाशी खेळ आहे. त्यामुळे तातडीनं गाडीचे ब्रेक तपासा.
2. टायर कसेत?आपल्या गाडीचे टायर पार सपाट झाले, हवा कमी असली तरी अनेकजण तशीच गाडी दामटतात. गाडीचे टायर उत्तम असणं गरजेचं आहे, त्यामुळे टायरकडे जरा लक्ष द्या.
3. हेडलाइटगाडीच्या दिव्यांचा काय विचार केलाय? ते लागतात की त्यांनी कायमचे डोळे मिटलेत? हेडलाइट लागत नसतील, इंडिकेटर बंद पडले असतील तर ते दुरुस्त करायला हवेत.
4. सव्र्हिसिंग केलं का?गाडीची खरं तर नियमित सव्र्हिसिंग करायला हवी. पण ती राहिली असेल तर निदान पावसाळ्यात तरी ती करून घ्या. गाडीला फार गृहीत धरणं बरं नाही.
5. कशी चालवताय गाडी?पावसाळ्यात मुद्दाम पाण्यातून, अतिवेगानं, झिप झ्ॉप धूम स्टाइल गाडी चालवणं जिवावर बेतू शकतं. त्यामुळे आपण कितीही स्मार्ट असलो तरी गाडी जपून चालवलेली बरी.
6. मोबाइलवर बोलणं
पाऊस आणि गाडी चालवताना मोबाइलवर बोलणं हे किती भयानक प्रकरण होऊ शकतं, हे सगळ्यानांच कळतं. गाडी चालवताना, मान वाकडी करून, कानात इअर फोनच्या वायरी खुपसून फोनवर बोलू नये हे सगळ्यांनाच माहिती असतं. फोनवर बोलत बोलत गाडी चालवू नये, मान तिरकी करकरून बोलू नये हा तर काय कॉमन सेन्सच आहे. मुळात गाडी चालवताना फोनवर बोलावं असा काय अर्जण्ट फोन कॉल आपल्याला येत असतो? आणि एखादा फोनजर इतकाच अर्जण्ट असेल तर गाडी बाजूला घ्यावी, शांतपणे त्या फोनवर काय बोलायचं ते बोलून घ्यावं आणि मग पुन्हा गाडी चालवावी हे सांगायला कुणी तज्ज्ञ कशाला हवा? पण लोक फोनवर बोलण्यासाठी इतके आतूर असतात की, गाडी चालवताना थोडंसं दुर्लक्ष झालं तरी त्यात आपला जीव जाऊ शकतो हे त्यांच्या लक्षातही येत नाही. तरुणांना विचारा की, गाडी चालवताना फोन वापरणं कधी थांबवाल, उत्तर एकच, आमचा फोनवर बोलताना अॅक्सिडेण्ट झाला तरच !पावसाळ्यात अशी आपत्ती ओढावू नये म्हणून तरी भरपावसात मोबाइलवर बोलत गाडी चालवू नका.