गंगाखेड ( परभणी ) : एटीएम केंद्रावर पैसे काढण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीच्या कार्डाची माहिती अवगत करून त्याचे क्लोन तयार करीत भामट्यांनी खात्यावरील १ लाख २० हजार रुपये लंपास केल्याची घटना दि. ९ डिसेंबर ते १५ डिसेंबर दरम्यान घडल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी दि. २७ जानेवारी रोजी रात्री गंगाखेड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एटीएम केंद्रावर पैसे काढत असतांना तुमचे पैसे काढून देतो असे सांगत एटीएम कार्डची अदलाबदल करत पासवर्ड हस्तांतरित करून खात्यावरील पैसे पळविल्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. पैसे पळविणाऱ्या हाय प्रोफाइल भामट्यांनी दि. ७ डिसेंबर २०१९ रोजी शहरातील एका युवकाकडील एटीएम कार्डवरील काही क्रमांक हस्तगत करून एटीएम कार्डचे क्लोन तयार करून महिलेच्या खात्यावरील ४० हजार रुपये पळविल्याची घटना घडली होती. याप्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला होता. याच गुन्ह्याची पुनरावृत्ती शहरात झाली आहे. दि. ९ डिसेंबर २०२० रोजी अशोक रामभाऊ कांदे ( वय ४५ वर्ष रा. जिरेवाडी ता. परळी, हल्ली मुक्काम चिखली, पुणे) हे गंगाखेड शहरात बहिणीला भेटण्यासाठी आले होते. पैश्यांची गरज पडल्याने त्यांनी शहरातील डॉक्टर लेन जवळील एसबीआय बँकेच्या एटीएम केंद्रावरून पाच हजार रुपये काढले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दि. १० डिसेंबर रोजी ते परत पुण्याला निघून गेले.
यानंतर दि. ११ डिसेंबर, १२ डिसेंबर, १३ डिसेंबर व दि. १५ डिसेंबर २०२० रोजी प्रत्येकी ३० हजार रुपये असे १ लाख २० हजार रुपये खात्यावरून काढल्याचा संदेश अशोक कांदे यांना प्राप्त झाला. त्यांनी लागलीच पुणे येथील बँकेत जाऊन याची चौकशी केली. त्यांच्या खात्यावरील एक लाख वीस हजार रुपये कमी झाल्याची माहिती समोर आली. गंगाखेड येथील एटीएम केंद्रावरून पैसे काढल्यानंतर हा प्रकार सुरू झाल्याने अशोक कांदे यांनी दि. २७ जानेवारी रोजी गंगाखेड येथील पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात भामट्यांविरुध्द फसवणुकीच्या गुन्ह्यासह माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर या करीत आहेत. दरम्यान, गंगाखेड येथील एटीएम केंद्रावर पैसे काढण्यासाठी आलेल्या अशोक कांदे यांच्या एटीएम कार्डची माहिती अवगत करून भामट्यांनी त्याचे क्लोन तयार केले असावे. या माध्यमातून त्यांच्या खात्यातून पैसे काढण्यात आले असावेत असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.