लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : महाराष्ट्र शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत परभणी जिल्ह्याला १ कोटी १९ लाख ८ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. १ जुलैपासून जिल्ह्यामध्ये विविध विभागांतर्गत वृक्षारोपण मोहीम राबविली जात आहे. ३० जुलैपर्यंत जिल्ह्यामध्ये ३४ लाख २६ हजार ६७९ वृक्षांचे रोपण करण्यात आले आहे.राज्यामध्ये सलग चार वर्षे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. त्यावर नामी उपाय म्हणून राज्य शासनाने मागील तीन वर्षापासून वृक्ष लागवड मोहीम सुरु केली आहे. या योजनेंतर्गत २०१६ या वर्षी द्विकोटी वृक्ष लागवड मोहीम राबविली. त्यामध्ये परभणी जिल्ह्याला २ लाख ८४ हजार ४८० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. २०१८ मध्ये १३ वृक्ष लागवड योजनेंतर्गत जिल्ह्याला ३२ लाख ४० हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. तर २०१९ म्हणजेच यावर्षी राज्य शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत १ कोटी १९ लाख ८ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.जुलै महिन्याच्या १ तारखेपासून परभणी जिल्ह्यामध्ये वृक्ष लागवडीस जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या थाटामाटात जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीच्या प्रांगणात वृक्ष लावून या मोहिमेचे उद्घाटन झाले. त्यानंतर ८ दिवस वन विभागाने परिश्रम करीत जिल्ह्यात अनेक ठिकाणी वृक्ष लावले आहेत; परंतु, १ जुलैनंतर जिल्ह्यातून पाऊस गायब झाला. त्यामुळे जिल्ह्यात सुरु असलेल्या वृक्ष लागवडीस ब्रेक बसला़ परंतु, मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यात रिपरिप पावसाने हजेरी लावली आहे. या संधीचा फायदा घेत जिल्ह्यातील अनेक प्रशासकीय विभाग आणि सामाजिक संघटना, सेवाभावी संस्थांनी वृक्ष लागवड करण्यास पुढाकार घेत वृक्ष लागवड सुरू केली आहे़ वृक्ष लागवडीसाठी राज्य शासनाची ३० सप्टेंबरपर्यंतची मुदत आहे. या मुदतीत जिल्ह्याला मिळालेले उद्दिष्ट पूर्ण होईल, अशी माहिती वन विभागाकडून देण्यात आली.३३ टक्के वृक्षांची लागवड४पावसाळा सुरु होऊन दोन महिने उलटले आहेत; परंतु, जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यात होत असलेल्या कमी-अधिक पावसामुळे वृक्ष लागवडीला वारंवार ब्रेक लागत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ३२.७२ टक्के वृक्ष लागवड करण्यात आली आहे.४यामध्ये सर्वाधिक वन विभागाने १७ लाख ७० हजार २८० वृक्षांची लागवड केली आहे. त्यानंतर सामाजिक वनीकरण विभागाने ५ लाख ४ हजार ८००, कृषी विभागाने १ लाख १ हजार ९३१, रेशीम उद्योग विभागाने १ लाख ४३ हजार वृक्षांचे रोपण केले आहे. येत्या काळात प्रशासकीय विभागांना देण्यात आलेले उद्दिष्ट लवकरच पूर्ण होईल, असा आशावाद आहे.वन महोत्सवालातील स्टॉललाही मिळाला प्रतिसाद४जिल्ह्यात मागील तीन वर्षात दुष्काळी परिस्थिती आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी वृक्ष लागवड करणे ही काळाची गरज ओळखून वन विभागाने वन महोत्सवांतर्गत सर्व सामान्य नागरिकांना व सेवाभावी संस्थांना वृक्ष लागवडीसाठी स्टॉल लावले होते.४ या स्टॉलमधून नागरिकांना अल्पदरामध्ये रोपट्यांची विक्री १ जुलै पासून करण्यात येत आहे. ३० सप्टेंबरपर्यंत या स्टॉलमधून वृक्ष विक्री केली जाणार आहे. या वन महोत्सवातील स्टॉललाही नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
परभणी जिल्ह्यात ३४ लाख २६ हजार वृक्ष लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 11:57 PM