मानवत : तालुक्यात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसान भरपाईचे दुसऱ्या टप्प्यातील ३२ हजार ८९१ शेतकऱ्यांचे १० कोटी ८८ लाखांचे अनुदान तहसील कार्यालयाला प्राप्त झाले असून, लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार असल्याची माहिती तहसील कार्यालयाने दिली.
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामा केल्यानंतर, तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष राज्य शासनाच्या मदतीकडे लागले होते. राज्य शासनाने मदत जाहीर केल्यानंतरही प्रत्यक्षात रक्कम उपलब्ध करून न दिल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. राज्य शासनाकडून अनुदानाची रक्कम प्राप्त होताच गावनिहाय शेतकऱ्यांच्या यादीनुसार अनुदानाचे वाटप करण्यासाठी पूर्ण तयारी महसूल विभागाने केली होती. पहिल्या टप्प्यात राज्य शासनाकडून दहा कोटी ८३ लाखांची मदत तहसील कार्यालयाला प्राप्त झाली होती. ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करून वाटप करणे सुरू आहे. नुकसान भरपाईचे अनुदान दोन टप्प्यांत वाटप केले जाणार असल्याने, सर्व शेतकऱ्यांना ५० टक्के म्हणजेच जिरायती क्षेत्रासाठी हेक्टरी ५ हजार, तर बागायती क्षेत्रासाठी हेक्टरी ९ हजार रुपये अनुदान मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे. तालुक्यातील एकूण २१ हजार ५९३ हेक्टरला अतिवृष्टीचा फटका बसला आहे. तालुक्यातील एकूण ३२ हजार ८१९ शेतकऱ्यांना या पावसाचा फटका बसला आहे. या नुकसान भरपाईपोटी राज्य शासनाने दुसऱ्या टप्प्यात १० कोटी ८३ लाख ८१ हजार ४९१ रुपये अनुदान तहसील कार्यालयाकडे वर्ग केले आहे. तहसील कार्यालयाकडून शेतकऱ्यांच्या याद्या तयार करून त्या बँकेकडे वर्ग केल्या जाणार आहेत. लवकरच प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यावर ही अनुदानाची रक्कम जमा होणार असल्याची माहिती तहसील कार्यालयाने दिली.
गावनिहाय शेतकऱ्यांची संख्या
मानवत : १,९६७
मानोली : १,२८१
उक्कलगाव : ९८७
नागरजवळा : ७७३
इरळद : ९८५
करंजी : ९८३
आंबेगाव : ६१६
निवडणुकीनंतर रक्कम जमा होणार
सद्यस्थिती तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू असल्याने, तहसील कार्यालयातील कर्मचारी तलाठी, निवडणूक प्रक्रियेत कर्तव्यावर आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या गावनिहाय याद्या करण्यासाठी ग्रामपंचायत निवडणूक संपण्याची वाट बघावी लागणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीनंतरच पैसे प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याची माहिती मिळत आहे.
दुसऱ्या टप्यातील नुकसान भरपाईची रक्कम तहसील कार्यालय प्राप्त झाली असून, शेतकऱ्यांच्या याद्या करून मदत बँकेकडे वर्ग करण्यात आली असून, शेतकऱ्यांना लवकर मदतीचे वाटप करण्याची प्रक्रिया सुरू होईल.
- डी. डी. फुफाटे, तहसीलदार, मानवत