पाटेकर यांच्या कारभारावरून सभागृहात गदारोळ
प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर यांच्या कारभारावरून यावेळी बराच गदारोळ झाला. आरटीईअंतर्गत खासगी शाळांना शासनाकडून आलेले परिपूर्ती अनुदान नियमांची पूर्तता न करणाऱ्या शाळांना चुकीच्या पद्धतीने पाटेकर यांनी वितरित केले. त्यामुळे त्यांच्या या निर्णय प्रक्रियेची चौकशी करावी यासाठी समितीचे गठण करावे, चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांचा पदभार काढून घ्यावा, अशी मागणी जि.प. सदस्या भावनाताई नखाते, सदस्य डॉ. सुभाष कदम, श्रीनिवास मुंडे व भगवानराव सानप यांनी केली. यावेळी बराच गदारोळ झाला. शेवटी सीईओ टाकसाळे यांनी या प्रकरणी चौकशीचे आश्वासन दिले. त्यानंतर भावनाताई नखाते यांनी पाटेकर यांच्या अन्य एका कारभाराचा मुद्दा उपस्थितीत केला. गेल्या वर्षभरापासून पाटेकर यांनी शाळांची संच मान्यता केलेली नाही. शिक्षकांच्या रिक्त जागा दाखविल्या जात नाहीत. सहकाऱ्यांना विश्वासात न घेता त्या मनमानी पद्धतीने निर्णय घेतात. त्यामुळे त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवावे, अशी मागणी केली.