पाथरी: कोविड-१९ चा प्रादुर्भाव वाढल्याने आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणावर ताण वाढला असताना तालुक्यातील २० आरोग्य उपकेंद्रातील ११ सामुदायिक आरोग्य अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. याचा फटका आरोग्य सेवेला बसू लागला आहे.
राज्य शासनाने प्रत्येक आरोग्य उपकेंद्रासाठी सामुदायिक आरोग्य अधिकारी हे पद निर्माण केले आहे. पाथरी तालुक्यात बाभळगाव, हदगाव, पाथरगव्हाण बु, वाघाळा हे चार प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. या आरोग्य केंद्रातर्गत २० आरोग्य उप केंद्र आहेत. शासनाने सामुदायिक आरोग्य अधिकारी यांची पदे भरताना तालुक्यातील २० पैकी केवळ ९ उपकेंद्रात सामुदायिक आरोग्य अधिकारी ही पदे भरली. उर्वरित ११ ठिकाणी ही पदे रिक्त आहेत.
सध्या कोविडचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. ग्रामीण भागात रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. लसीकरण मोहीमही सुरू आहे. अशा परिस्थितीत सामुदायिक आरोग्य अधिकारी पदे रिक्त असल्याने आरोग्य यंत्रणेवर अधिकच ताण येऊ लागला आहे. तर आरोग्य सेवेवरही त्याचा परिणाम जाणवू लागला आहे.
वैधानिक अधिकारी यांची पदेही रिक्त
तालुक्यात चार प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. त्यात प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात २ वैद्यकीय अधिकारी पदे मंजूर आहेत. मात्र पाथरगव्हाण, हदगाव आणि वाघाळा येथे वैद्यकीय अधिकाऱ्याचे एक पद रिक्त आहे. हदगाव बुद्रूक येथे दोन वैद्यकीय अधिकारी नियुक्त असले तरी त्यातील एक वैद्यकीय अधिकारी परभणी येथे कोविड सेंटरवर प्रतिनियुक्तीवर आहेत.