परभणी : नियोजन समितीने प्रस्तावित केेलेला ११४ कोटी रुपयांचा निधी अद्याप जिल्ह्याला प्राप्त झालेला नाही. त्यामुळे कोरोना ओसरला तरीही विकासकामे मात्र ठप्प आहेत. त्यामुळे या कामांना कधी महूर्त लागणार? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
दोन वर्षांपासून जिल्ह्यात कोरोनाचे संकट निर्माण होत आहे. त्यामुळे विकास कामांसाठी राखून ठेवलेला निधी कोरोनाच्या उपाययोजनांसाठी खर्च केला जात आहे. २०२०-२१ या वर्षातही जिल्ह्यासाठी प्रस्तावित केलेला बहुतांश निधी कोरोनासाठी खर्च झाला. तीच परिस्थिती २०२१-२२ या वर्षात निर्माण झाली आहे.
यावर्षीच्या एप्रिल महिन्यात नियोजन समितीने वर्षभराच्या कामांचा आराखडा तयार केला. २२५ कोटी रुपयांच्या या आराखड्याला राज्य शासनाने मंजुरी दिली खरी; मात्र नियोजनचा अधिकांश निधी कोरोनाच्या उपाययोजनांसाठी खर्च करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे इतर कामांसाठी राखून ठेवलेला निधी कोरोनावर खर्च करावा लागला. विशेष म्हणजे २२५ कोटी रुपयांचा आराखडा असताना सुरुवातीला केवळ १० टक्के निधी देण्यात आला. त्यानंतरच्या टप्प्यात आरोग्यासाठी प्रस्तावित केलेल्या योजनांसाठी निधी देण्यात आला. आतापर्यंत जिल्ह्याला १११ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. मात्र ही संपूर्ण रक्कम कोविडसाठीच वापरण्याचे निर्देश आहेत. त्यामुळे इतर विकास कामांचे काय? असा प्रश्न निर्माण होत आहे,
सध्या कोरोनाचा संसर्ग कमी झाला असून, सर्व व्यवहार पूर्ववत झाले आहेत. मात्र नियोजन समितीने प्रस्तावित केलेले ११४ कोटी रुपये अद्याप प्राप्त झाले नाहीत. त्यामुळे रस्ते, रोजगार, वृक्षारोपण, शासकीय इमारतींचे बांधकाम, कृषी योजना, पशुवैद्यकीय योजनांची कामे ठप्प आहेत. हा निधी मिळावा, यासाठी लोकप्रतिनिधींनीच पुढाकार घेण्याची गरज आहे.
मागीलवर्षीप्रमाणे निर्णयाची गरज
मागीलवर्षीही कोरोनाचा संसर्ग होता. हा संसर्ग कमी झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विकास कामांना गती देण्यासाठी डिसेंबर महिन्यात नियोजनचा १०० टक्के निधी वितरित केला होता. यावर्षी देखील उर्वरित निधी वितरित करण्यासाठी निर्णय घेण्याची गरज आहे.
आरोग्यचा संपूर्ण निधी मिळाला
नियोजन समितीने आरोग्य विभागासाठी प्रस्तावित केलेला संपूर्ण निधी जिल्ह्याला प्राप्त झाला आहे. मात्र हा निधी कोविडसाठीच वापरण्यात आला. त्यामुळे इतर कामे ठप्प आहेत. उर्वरित ११४ कोटींचा निधी जिल्ह्याला मिळाला, तर ठप्प कामांना गती मिळू शकेल.
नियोजन समितीचा प्रस्तावित आराखडा
२२५ कोटी
कोविड व आरोग्यसाठी मिळालेला निधी
१११ कोटी
शिल्लक निधी
११४ कोटी