परभणी : ग्रामपंचायत अंतर्गत होणाऱ्या वैयक्तिक लाभासह सार्वजनिक कामांचा लेखाजोखा व समन्वयक म्हणून काम पाहणाऱ्या ग्राम रोजगार सेवकांचे मानधन प्रशासनाकडून सहा महिन्यांपासून देण्यात आलेले नाही. त्यामुळे तालुक्यातील ११७ ग्राम रोजगार सेवकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन या ग्रामरोजगार सेवकांचे मानधन अदा करावे, अशी मागणी होत आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतील वैयक्तिक सिंचन विहीर, फळबाग लागवड योजना यासह इतर कामे व पंतप्रधान आवास योजना, रमाई घरकुल योजना त्याचबरोबर शौचालय ही सर्व विविध कामे करून घेणे, त्यावर लक्ष ठेवून प्रशासन व लाभार्थ्यांमध्ये समन्वयाची भूमिका पार पाडून संबंधित घटकासाठी असलेले अनुदान लाभार्थ्याच्या पदरात पाडून देणे, यासह विविध कामे ग्राम रोजगार पार पडतात.
परंतु या ग्रामरोजगार सेवकांना कामाच्या मोबदल्यात मिळणारे तुटपुंजे मानधनही सहा महिन्यांपासून थकीत आहे. त्यामुळे या ग्राम रोजगार सेवकांवर उपासमारीची वेळ आली आहे. याबाबत पंचायत समितींना वारंवार कल्पना देऊनही मानधन मिळत नसल्याने हे ग्राम रोजगार सेवक हताश झाले आहेत. याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देऊन तत्काळ सहा महिन्यांपासून थकीत मानधन देण्यात यावे, अशी मागणी आर. एस. मुलगीर, कृष्णा कदम अनंत अवचार, गजानन मोरे, शिवाजी काळे, के. एस. लासे, किरण कदम, सिद्धार्थ कोंडके, उद्धव ढगे यांच्यासह ग्राम रोजगार सेवकांनी केली आहे.