लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या आॅनलाईन प्रक्रियेअंतर्गत झालेल्या बदल्यांमध्ये १२ जि.प.शाळांवर सद्यस्थितीत एकही शिक्षक राहिला नसल्याची बाब समोर आली आहे.जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या पाच फेऱ्यांमध्ये आॅनलाईन पद्धतीने आतापर्यंत बदल्या करण्यात आल्या आहेत. एनआयसीमार्फत होत असलेल्या या बदली प्रक्रियेचा एकीकडे काही अंशी फायदा होत असला तरी दुसरीकडे तोटाही दिसून येत आहे. बदली प्रक्रियेअंतर्गत प्रत्येक शिक्षकाला २० शाळांचे पर्याय द्यायचे आहेत. त्यामुळे संबंधित शिक्षक हे त्यांना सोयीच्या वाटतील त्या क्रमानुसार शाळांची नावे देत आहेत. विशेष म्हणजे त्यानुसारच शिक्षकांना नियुक्त्या आतापर्यंत देण्यात आल्या आहेत. ही सर्व प्रक्रिया आॅनलाईन असल्याने काही शाळांवर शिक्षकच शिल्लक राहत नसल्याची बाब समोर आली आहे. परभणी जिल्ह्यात अशा १२ शाळा समोर आल्या आहेत. त्यामध्ये पाथरी तालुक्यातील किन्होळा, टाकळगव्हाण, लोणी तांडा, जिंतूर तालुक्यातील उमदरा, भुसकटवाडी, शिवाचीवाडी, पिंपरी बु., बेलोरा, मानवत तालुक्यातील कुंभारी, सोनपेठ तालुक्यातील वाघलगाव, शेळगाव येथील उर्दू व थडी पिंपळगाव अशा १२ शाळांचा समावेश आहे. या शाळांवर एकही शिक्षक सद्यस्थितीत उपलब्ध राहिला नसल्याने शैक्षणिक वर्ष सुरुहोण्यापूर्वीच नवीन समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे तातडीने या जागी तात्पुरत्या स्वरुपात शिक्षकांची नियुक्ती करण्याची वेळ जि.प.प्रशासनावर आली आहे. विशेष म्हणजे राज्यस्तरावर हीच समस्या आहे. या संदर्भात १३ जून रोजी राज्याच्या ग्रामविकास विभागाचे अव्वर सचिव पी.एस.कांबळे यांच्या स्वाक्षरीनिशी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या नावे आदेश काढण्यात आला आहे. त्यात रॅण्डमायझेशन राऊंडद्वारे बदल्यांचे आदेश होईपर्यंत ज्या शाळांवर एकही शिक्षक नाही, अशा शाळांमध्ये तात्पुरत्या स्वरुपात शिक्षकांची नियुक्ती करावी, जेणेकरुन शिक्षकांविना शाळा राहणार नाहीत, याची काळजी घ्यावी. तसेच ज्या शाळांमध्ये एकही शिक्षक नाही, त्या शाळांची नावे, त्यांचा युजर आयडी व क्लस्टर याबाबतची माहिती तातडीने सादर करावी, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.१६९ विस्थापित शिक्षकांना नियुक्त्याबदली प्रक्रियेअंतर्गत जिल्ह्यातील १६९ विस्तापित शिक्षकांना आतापर्यंत नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील १८ विस्तापित शिक्षकांना अद्यापही नियुक्त्या देण्यात आल्या नाहीत.या शिक्षकांनाही लवकरच नियुक्त्या मिळतील, असे प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा गरुड यांनी सांगितले. विशेष म्हणजे एकीकडे जिल्ह्यातील १२ शाळांवर एकही शिक्षक नसताना तब्बल १८ शिक्षकांना एकही शाळा मिळालेली नाही. त्यामुळे आॅनलाईन प्रक्रियेतील हा एक दोष यानिमित्ताने समोर आला आहे.