परभणी : चोरटी विक्री करण्यासाठी आंध्र प्रदेशातून आणलेला ११.९६७ किलो गांजा येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सेलू शहरातील फुलेनगर भागात छापा टाकून जप्त केला. २९ एप्रिल रोजी पहाटे २.३० वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली.
स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पवार हे सेलू शहरात गस्त घालत असताना शहरातील फुलेनगर भागात एका घरामध्ये गांजा साठविल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर चंद्रकांत पवार यांनी ही माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाल यांना दिली. या माहितीच्या आधारे पंचांसमक्ष छापा टाकण्याची तयारी करण्यात आली. २८ एप्रिल रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पवार, विश्वास खोले, सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, अरुण पांचाळ, शंकर गायकवाड, अरुण कांबळे तसेच सेलू पोलीस ठाण्याचे निरीक्षक गोवर्धन भुमे, तहसीलदार बालाजी शेवाळे, सहायक निरीक्षक सरला गाडेकर यांच्यासह दोन शासकीय पंच घेऊन फुलेनगर परिसरामध्ये २९ एप्रिल रोजी
मध्यरात्री २ वाजता छापा टाकण्यात आला.
फुलेनगर परिसरातील संबंधित घरात जाऊन पोलिसांनी तपासणी केली, तेव्हा आरोपी मल्हारी रावसाहेब मुकणे याच्या घरामध्ये निळ्या रंगाच्या प्रवासी बॅगमध्ये गांजाची दोन पाकिटे आढळली. एका पाकिटामध्ये ६.०६७ ग्रॅम, तर दुस-या पाकिटामध्ये ५.९०० ग्रॅम असा एकूण ११.९६७ किलो गांजा पोलिसांनी या ठिकाणी जप्त केला. जप्त केलेल्या गांजाची किंमत १ लाख १९ हजार ६७० रुपये एवढी आहे. याप्रकरणी आरोपी मल्हारी रावसाहेब मुकणे यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस उपनिरीक्षक विश्वास खोले यांच्या फिर्यादीवरून आरोपी मल्हारी मुकणे याच्याविरुद्ध सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मल्हारी मुकणे याच्याकडे विचारणा केली तेव्हा हा गांजा आंध्र प्रदेशातून चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने आणला असल्याचे त्याने कबूल केले. विशेष म्हणजे या पथकाने यापूर्वीही चरस, गांजाच्या विरोधात कारवाई केली असून, सेलूच्या आणखी एका कारवाईत याची भर पडली आहे.