परभणी : प्रशासकीय कामकाजात हलगर्जीपणा केल्या प्रकरणी पोलीस अधीक्षक कृष्ण कांत उपाध्याय यांनी १२ पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे़ या संदर्भातील आदेश शुक्रवारी रात्री काढण्यात आले़.
प्रशासकीय कामकाजात सुधारणा आणण्याच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक कृष्ण कांत उपाध्याय यांनी कडक उपाय योजना सुरू केल्या आहेत़ या अंतर्गत शासकीय सेवेत हलगर्जीपणा करणे, शिस्तभंग करणे, वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी न घेताच गैरहजर राहणे, कर्तव्यात कसूर करणे आदी प्रकरणी १२ पोलीस कर्मचाऱ्यांना समज देऊनही त्यांच्या वर्तवणुकीत सुधारणा झाला नसल्याने त्यांना निलंबित करण्याचे आदेश शुक्रवारी रात्री काढण्यात आले आहेत. या कारवाईने पोलीस दलात खळबळ उडाली आहे़ .
यांना केले निलंबित
पोलीस मुख्यालयातील पोलीस हवालदार कारभारी दादाराव वाघमारे, राजेश सत्यनारायण वाजपेयी, श्रीधर रामराव खोकले, गजानन शिवाजी पाटील, व्यंकट संभाजी बिलापट्टे, विजय नागनाथ उफाडे, जिंतूर ठाण्यातील निहाल अहमद नूर पटेल, विनायक मारोतराव भोपळे, पोलीस नियंत्रण कक्षातील सुरेश सटवाजी पानझडे, पाथरी पोलीस ठाण्यातील संतोष उत्तमराव जोंधळे, नानलपेठ पोलीस ठाण्यातील संतोष अन्सीराम जाधव व गंगाखेड पोलीस ठाण्यातील सुरेश कानोबा मोरे या १२ पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.