सेलू तालुक्यातील ६७ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी २०५ वाॅर्डातून ५१९ सदस्य निवडीसाठी निवडणूक प्रक्रिया चालू होती. यासाठी १ हजार २९४ नामनिर्देशन अर्ज वैध ठरले होते. उमेदवारी अर्ज परत घेण्याच्या अंतिम दिवशी म्हणजे ४ जानेवारी रोजी २८४ उमेदवारांनी आपला उमेदवार अर्ज मागे घेतले. यामध्ये ६७ पैकी खैरी, कन्हेरवाडी, वाईबोथ, गोहेगाव, तळतुंबा, प्रिंप्राळा, खुपसा, केमापूर, लाडनांदरा, निरवाडी खु., करजखेडा, निपानी टाकळी या १२ ग्रामपंचायती बिनविरोध निश्चित झाल्या आहेत. इतर १२ ग्रामपंचायतींमधील विविध प्रभागातून जवळपास २१ सदस्यांच्या विरोधात एकही उमेदवार नसल्याने त्यांचीदेखील निवड ही बिनविरोध झाल्याचे स्पष्ट होत आहे. ५१९ पैकी १२ ग्रामपंचायतींचे ८६ व इतर १२ ग्रा.पं. विविध प्रभागातील २१ अशाप्रकारे १०७ सदस्यांची निवड ही बिनविरोध निश्चित झाली आहे. आता ५५ ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेतून ४१२ सदस्य निवडीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. यासाठी १ हजार १० उमेदवारी अर्ज निवडणूक रिंगणात असल्याचे चित्र सोमवारी स्पष्ट झाले.
पॅनलप्रमुखांचा कपबशी पसंतीचा हिरमोड
उमेदवारी अर्ज परत घेण्याची मुदत संपताच निवडणूक निर्णय अधिकारी यांनी चिन्हांचे वाटप सुरू केले. बहुतांश पॅनलप्रमुखांनी कपबशी, छत्रीला पसंती दिली होती; मात्र बऱ्याच ठिकाणी अपक्ष उमेदवारांनी अर्ज आगोदर भरल्याने त्यांना प्राधान्यक्रमाने त्यांनी कपबशी व छत्री हे चिन्ह घेतल्याने पॅनल प्रमुखांचा हिरमोड झाला आहे. दरम्यान, कपबशी व छत्रीची पसंती सोडून पॅनल प्रमुखांनी ऑटोरिक्षा, जग, गॅस सिलिंडर, दूरदर्शन या चिन्हांना पसंती द्यावी लागली.
ग्रामपंचायतीच्या लक्षवेधी लढती
राजकीय दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये लक्षवेधी लढती होत असून तालुक्याचे लक्ष लागलेल्या ग्रामपंचायत वालूर, देऊळगाव गात, आहेर बोरगाव, हादगाव खु., कुंडी, मोरेगाव, देवगावफाटा, चिकलठाणा बु., रायपूर, शिराळा, सिमणगाव या ग्रामपंचायतीमध्ये दुरंगी लढती पाहायला मिळणार आहेत.