शुक्रवारी आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येणाऱ्या कोरोना चाचणीची संख्या अचानक घटली. गुरुवारी ३४३ जणांची तपासणी करण्यात आली होती. शुक्रवारी मात्र १८७ जणांचीच तपासणी करण्यात आली. त्यात १०६ जणांचे स्वॅब घेण्यात आले, तर ८१ जणांची रॅपिड टेस्ट करण्यात आली. त्यात ५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, तर यापूर्वी घेतलेल्या स्वॅब नमुन्यांपैकी ८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे दिवसभरात जिल्ह्यात १३ बाधितांची नोंद झाली आहे, तर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एका पुरुषाचा मृत्यू झाला आहे. ११ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत ८ हजार २१६ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, त्यातील ७ हजार ७३३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत ३१९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत १६५ रुग्ण आरोग्य संस्थांमध्ये उपचार घेत आहेत.
परभणीत सर्वाधिक रुग्ण
शुक्रवारी आलेल्या अहवालात परभणी शहरात ७ बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये शहरातील मथुरानगर, व्यंकटेशनगर, शिवाजीनगर, बाळासाहेब ठाकरेनगर, धनलक्ष्मीनगर, त्रिमूर्तीनगर, तेली गल्ली येथील रुग्णांचा समावेश आहे. याशिवाय गंगाखेड शहर, तालुक्यातील खोकलेवाडी, रुमणा, जालना जिल्ह्यातील परतूर आणि माजलगाव तालुक्यातील सावरगाव येथील रुगणांचा समावेश आहे.