जिंतूर : तालुक्यातील भोगाव देवी येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये साठवून ठेवलेला १३४ पोती तांदूळ पोलिसांनी १ डिसेंबर रोजी कारवाई करीत जप्त केला असून, एका आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आता या तांदुळाचे नमुने तपासणीसाठी महसूल विभागाकडे पाठविले जाणार आहेत.
जिंतूर तालुक्यामध्ये स्वस्त धान्याचा काळाबाजार करणारी टोळी कार्यरत आहे. गोरगरिबांना मिळणारे धान्य ग्रामीण भागातून स्वस्त धान्य दुकानदारांकडून व इतरांकडून खरेदी करून काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी मोठी साखळी कार्यरत असून, तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये त्यांची गोदामे आहेत. भोगाव देवी येथे मोहसीन मोहम्मद कुरेशी यांनी पत्र्याच्या शेडमध्ये १३४ पोती तांदूळ साठवून ठेवल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक विश्वास खोले यांना मिळाली. त्यावरून पोलीस अधीक्षक जयंत मीना, सहायक पोलीस अधीक्षक श्रवण दत्त व पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय चिंचाणे, राहुल चिंचाणे, अनिल हिंगोले, अझर पटेल, राजेश बाबर आदींच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास भोगाव देवी येथे छापा टाकला. याप्रकरणी मोहसीन मो. कुरेशी यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून, जप्त केलेल्या धान्याचे नमुने महसूल प्रशासनाला दिले जाणार आहेत. त्यानंतरच गुन्हा नोंद केला जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.