सेलू : निम्न दुधना प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात सोमवारी रात्री मुसळधार पाऊस झाल्याने दुधना प्रकल्पात पाण्याची आवक वाढली असून, या प्रकल्पाचे १४ दरवाजे उघडून ३० हजार ३२४ क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात केला जात आहे. त्यामुळे अनेक गावांचे दळण-वळण ठप्प झाले आहे.
निम्न दुधना प्रकल्पात सध्या ९४ टक्के साठा आहे. अतिरिक्त पाणी टप्प्याटप्प्याने नदीपात्रात सोडले जात आहे. सद्यस्थितीला प्रकल्पाचे १४ दरवाजे ०.६० मीटरने उचलून ३० हजार ३२४ क्युसेक पाण्याचा दुधना नदीपात्रात विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे मोरेगाव - देवगाव फाटा - जालना- औरंगाबाद मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. तसेच सेलू ते वालूर रस्त्यावरील राजवाडी पुलावरून पाणी वाहत असल्याने हा मार्ग ठप्प झाला आहे. प्रकल्पाच्या परिसरात २४ तासांत ४८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
पुन्हा नदी काठावरील शेतीचे नुकसान
निम्न दुधना प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदी काठावरील शेतीचे पुन्हा एकदा नुकसान झाले आहे. या अगोदर ६ सप्टेंबर रोजी पिकांचे नुकसान झाले होते, परत एकदा पाणी सोडले जात असल्याने तालुक्यातील सेलू ते देवगाव फाटा आणि वालूर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.