गंगाखेड : वीज वितरण कंपनीने थकीत बिलांच्या वसुलीसाठी धडक मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत तालुक्यातील १४ गावांचा वीजपुरवठा आठवडाभरापासून खंडित केला आहे. त्यामुळे ग्रामस्थांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
गंगाखेड तालुक्यातील गावांत वीज वितरण कंपनीची मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे. या थकबाकीसाठी महावितरणने अनेकवेळा वसुलीचा तगादा लावला होता. मात्र त्याकडे ग्राहकांनी काणाडोळा केला. परिणामी महावितरणच्या वरिष्ठ कार्यालयाकडून मागील १५ दिवसांपासून विशेष वसुली मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत थकबाकी असलेल्या तालुक्यातील १४ गावांचा वीजपुरवठा मागील आठवडाभरापासून खंडित केला आहे. त्यामुळे इरळद, नरळद, दामपुरी, लिंबेवाडी, अरबूजवाडी, विठ्ठलवाडी, वागलगाव, कौडगाव, शेंडगा, हरंगुळ, धनगरमोहा, उखळी, मानकादेवी, उंडेगाव, पिसेवाडी या गावांतील ग्रामस्थांच्या दळणवळणासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
रीडिंग न घेताच दिली बिले
गंगाखेड तालुक्यात कोरोनाच्या परिस्थितीमुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. लॉकडाऊनच्या काळात प्रत्यक्ष मीटर रीडिंग न घेता महावितरण कंपनीने ग्राहकांना वीजबिले दिली आहेत. काही ग्राहकांना मोठ्या रकमेची बिले आली आहेत,तर काहींना बिलेच मिळाली नाही. परिणामी महावितरणच्या निष्काळजीपणामुळे ग्राहकांना वेळेत देयके भरण्यात अडचणी आल्या. मात्र याबाबत कोणताही पर्याय न काढता सरळ वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे.