परभणी - लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून एकमेकांवर गंभीर आरोप करण्यात येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप केला आहे. मोदींनी घेतलेल्या नोटाबंदी निर्णयावरुन पवारांनी मोदींना लक्ष्य केलं. मोदींच्या एका निर्णयामुळे सव्वाशे लोक मृत्युमुखी पडले तर 15 लाख तरुणांच्या नोकऱ्या गेल्या, त्यामुळे 15 लाख लोकांचा मृत्यू महाराष्ट्रात झाल्याचे पवार यांनी म्हटले.
नोटाबंदीनंतर 15 लाख मुलांच्या नोकऱ्या गेल्या, कारण कारखानदारी बंद पडली. एका निर्णयामुळे 15 लाख लोकांचा मृत्यू महाराष्ट्रात होतो, हे कर्तृत्व भाजपाच्या, देशाच्या प्रधानमंत्र्यांनी नागरिकांसाठी केलंय. हातामधी आलेली सत्ता लोकांसाठी वापरायची असते, ती सत्ता लोकांसाठी न वापरता त्याचा गैरवापर केला, असे पवार यांनी परभणी येथील लोकसभा उमेदवार राजू टिकेकर यांच्या प्रचारसभेवेळी बोलताना म्हटले. नोटाबंदीनंतर सबंध भारताला लाईनीत उभं करण्याचं काम या देशाच्या पंतप्रधानांनी केलं. एका निर्णयामुळे तीन दिवस भारत लाईनीत उभा राहिला. लाईनीत उभे राहणाऱ्यांत कुणीही मोठा उद्योगपती नव्हता, लाईनीत उभे राहणारे लोकं हे सर्वसामान्य होते. कामगार होते, शेतकरी होते, गरीब होते. मात्र, मोदींनी उद्योजकांचा काळा पैसा काढत असल्याचे सांगत गरिबालाच तीन दिवस उन्हा-तान्हात लाईनीत उभे केल्याचं पवार यांनी म्हटलं.
शरद पवार यांनी परभणीतील सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा सरकारवर मोठा हल्ला चढवला. नोटाबंदी, काळापैसा, शेतकरी आत्महत्या, राफेल करार, 15 लाख रुपयांचा मुद्दा आणि एअर स्ट्राईकवरुन सुरू असलेलं राजकारण यासंदर्भातील मुद्दे उपस्थित करत मोदींवर शाब्दिक स्ट्राईक केला. तसेच या सरकारला हातातून सत्ता काढून घेऊ, या सरकारला सत्तेतून हाकलून देऊ, त्यासाठी राष्ट्रवादीला मतदान करण्याचे आवाहनही पवार यांनी केलं.