गंगाखेड येथील सराफा व्यावसायिक महेंद्र बालाजी टाक हे ४ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजता फिरण्यासाठी जात असताना त्यांच्या घराच्या चॅनल गेटजवळ एक चिठ्ठी दिसून आली. त्यांनी चिठ्ठी वाचून पाहिली असता, त्यात २० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करून सर्व नोटा वेगळ्या नंबरच्या व दोन हजार रुपयांच्याच दिलेल्या राजेंदर पेठ गल्ली येथील एका मंदिराच्या डाव्या बाजूला उभ्या असलेल्या गाड्यावर उद्या रात्री १ वाजेपर्यंत घेऊन ये, अन्यथा तुझ्या घरातील एक माणूस कमी होईल, तसेच पैसे नाही दिल्यास व पोलिसांना सांगितल्यास भरदिवसा गोळी मारु, अशी धमकी या चिठ्ठीत देण्यात आली. ही चिठ्ठी सराफा व्यापारी टाक यांनी वाचून त्यांच्या पत्नीला याबाबत सांगितले. त्यानंतर त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. खबरदारी म्हणून त्यांच्या घराच्या परिसरात सीसी टीव्ही बसविले. ११ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजता पुन्हा त्यांच्या घराच्या चॅनल गेटजवळ एक चिठ्ठी त्यांना दिसली. त्यामध्ये दिलेल्या पत्त्यावर १५ लाख रुपये घेऊन ये, रकमेमध्ये २ हजार व ५०० रुपयांच्या नोटा हव्यात, पैसे न दिल्यास कुटुंबीयांची बदनामी करू, शिवाय २०० मुलं घरी घेऊन येतो, तसेच जिवाचे बरे-वाईट करतो, असेही या चिठ्ठीत नमूद केले होते. त्यामुळे घाबरलेल्या टाक यांनी घरातील सीसी टीव्हीचे फुटेज बघितले असता, रात्री १२.५८ मिनिटांनी एक २५ ते ३० वर्षांचा तरुण चिठ्ठी टाकत असताना दिसून आला. याबाबत सराफा व्यावसायिक टाक यांनी १८ सप्टेंबर रोजी गंगाखेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
सराफा व्यापाऱ्याला मागितली १५ लाखांची खंडणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 4:20 AM