परभणी : जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग लक्षणीयरीत्या घटला असून रविवारी १५ नवीन बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
मागील तीन-चार आठवड्यांपासून जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग घटला आहे. त्यामुळे सर्व व्यवहार खुले करण्यात आले आहेत. अनलॉकच्या प्रक्रियेनंतरही रुग्णांची संख्या वाढली नसल्याने नागरिकांना दिलासा मिळत आहे. रविवारी आरोग्य विभागाला १ हजार ३८ नागरिकांचे अहवाल प्राप्त झाले. आरटीपीसीआरच्या ९८० अहवालांमध्ये १२ आणि रॅपिड टेस्टच्या ५८ अहवालांमध्ये ३ असे एकूण १५ नवीन रुग्ण नोंद झाले आहेत. तर, खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एका रुग्णाचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या आणि मृत्यूचे प्रमाणही कमी झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात एकूण ५० हजार ६०८ रुग्णसंख्या झाली असून ४९ हजार ६६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. १ हजार २७४ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला. सध्या २६८ रुग्ण उपचार घेत आहेत. रविवारी दिवसभरात ६३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.