परभणी : न्यायिक जिल्ह्यात रविवारी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणतर्फे केले होते. या लोक अदालतीमध्ये ठेवण्यात आलेली एकूण १६ हजार ३७ प्रकरणे निकाली काढण्यात आली. तर या प्रकरणांच्या माध्यमातून एकूण १८ कोटी ४७ लाख ७९ हजार ३१५ रुपयांची वसुली झाली आहे.
परभणी शहरातील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकारणच्या अध्यक्ष उज्वला नंदेश्वर यांच्या अध्यक्षतेखाली लोक अदालतीचे रविवारी सकाळी उद्घाटन झाले. याप्रसंगी प्रमुख जिल्हा न्यायाधीश एस. एस.नायर व न्यायाधीश वकील संघ, विधी सेवा प्राधिकरण सचिव एस.जी.लांडगे यांची उपस्थिती होती. या लोक अदालतीमध्ये सर्व प्रकारची तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, भारतीय चलनक्षम दस्तऐवज अधिनियम १८८१, बँक वसुली प्रकरणे, मोटार अपघात प्रकरणे, कौटुंबिक वाद, कामगार, भूसंपादन, वीज प्रकरणे, चोरीची प्रकरणे वगळून व पाणी आकार प्रकरणे, वेतन व भत्त्याची सेवा विषयक प्रकरणे, महसूल आणि दिवाणी स्वरूपाची तसेच बँकेची वसुली वादपूर्व दाखल प्रकरणे ठेवण्यात आली होती. या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये न्यायालयातील प्रलंबित तडजोड पात्र विविध प्रकरणांचा निपटारा जिल्हाभरात करण्यात आला.
या प्रकारातील होती प्रकरणेन्यायालयातील प्रलंबित : ७४६ प्रकरणे निकालीस्पेशल ड्राईव्ह, २५८ सीआरपीसी : ७५९ प्रकरणेवाद दाखल पूर्व इतर प्रकरणे : १४५३२ प्रकरणे
अशी झाली रकमेची वसुलीन्यायालयातील प्रलंबित ७४६ प्रकरणांमध्ये ११ कोटी २७ लाख २८ हजार ६१५ रुपये तर वाद दाखल पूर्व इतर प्रकरणे ज्यात १४ हजार ५३२ प्रकरणे ठेवण्यात आली होती. यामध्ये सात कोटी वीस लाख ५० हजार ७०० रुपयांची वसुली झाली. एकूण १६ हजार ३७ प्रकरणांमध्ये १८ कोटी ४७ लाख ७९ हजार ३१५ रुपयांची वसुली झाल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणने दिली.