लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : क्षयरोगाच्या रुग्णांना शोधून त्यांच्यावर योग्य उपचार करण्यासाठी येथील जिल्हा क्षयरोग विभागाकडून प्रयत्न केले जात असून, दोन महिन्यांमध्ये १६८ रुग्णांचा शोध घेण्यात आला आहे.
इतर गंभीर आजारांप्रमाणेच क्षयरोगाचा समावेश गंभीर आजारांच्या यादीमध्ये झाला आहे. त्यामुळे शासनाने क्षयरोग मुक्तीसाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत शासकीय रुग्णालयांबरोबरच खासगी रुग्णालयांनाही क्षयरोग रुग्ण शोधण्याचे उद्दिष्ट दिले जाते. जानेवारी ते डिसेंबर या वर्षभरात क्षयरोग विभागाकडून रुग्णांचा शोध घेतला जातो. यावर्षी जिल्ह्याला २ हजार ५०० रुग्ण शोधण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यामध्ये शासकीय रुग्णालयांना १ हजार ९०० तर खासगी रुग्णालयांना ६०० रुग्ण शोधण्याचे उद्दिष्ट दिले आहे. दोन महिन्यांच्या काळात शासकीय रुग्णालयांनी ११० रुग्णांचा शोध घेतला आहे तर दुसरीकडे खासगी रुग्णालयातून ५८ रुग्णांची नोंदणी झाली आहे. गतवर्षी कोरोनाचा संसर्ग असल्याने जिल्ह्यातील सर्व यंत्रणा हा संसर्ग रोखण्यात गुंतली होती. कोरोना वगळता इतर आजारांचे रुग्णही मोठ्या संख्येने कमी झाले. क्षयरुग्णांच्या संदर्भातही असाच प्रकार झाला होता. कोरोनाच्या या संकटामुळे गतवर्षी जिल्ह्याला दिलेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत केवळ ५६ टक्के रुग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर उपचार सुरू झाले होते. यावर्षी हे प्रमाण वाढविण्यासाठी क्षयरोग विभाग प्रयत्न करत आहे. दोन महिन्यांमध्येच १६८ रुग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर उपचार सुरू केल्याची माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. कालिदास निरस यांनी दिली.
खासगी रुग्णालयांना रुग्णांची नोंद करणे बंधनकारक
क्षयरोगाचा समावेश गंभीर धोकादायक आजारांच्या यादीत झाल्याने क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम राबविला जातो. त्यामुळे खासगी वैद्यकीय व्यावसायिक, पॅथॉलॉजी लॅब, रेडिओलॉजिस्ट आणि औषध विक्रेत्यांना त्यांच्याकडे निदान झालेल्या क्षयरुग्णांची नोंद शासनाकडे करणे बंधनकारक आहे, असे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. कालिदास निरस यांनी सांगितले.
२०२५पर्यंत क्षयरोगमुक्त भारत हा संकल्प करण्यात आला असून, त्यानुसार आरोग्य विभागाकडून जनजागृती मोहीम राबविली जात आहे. अनेक क्षयरुग्ण खासगी पॅथॉलॉजी लॅब, औषध विक्रेत्यांकडे जावून औषधाेपचार करतात. त्यामुळे शासनाकडे या रुग्णांची नोंद राहात नाही. त्यामुळे राष्ट्रीय क्षयरोग कार्यक्रमाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी खासगी रुग्णालयांमध्ये नोंद झालेल्या सर्व क्षयरुग्णांची माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी, पीपीएम समन्वयक किंवा शेजारच्या शासकीय आरोग्य संस्थेकडे सादर करावी, असे आवाहन निरस यांनी केले आहे.
क्षयरोगाची लक्षणे
दोन आठवड्यांपर्यंत खोकल्याचा त्रास, हलका ताप, भूक मंदावणे, खोकलताना रक्त पडणे अशी क्षयरोगाची लक्षणे आहेत. ही लक्षणे आढळल्यास रुग्णांनी शासकीय रुग्णालयात जावून तपासणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.