परभणी : मराठा समाजबांधवांनी पुकारलेल्या बंदमुळे दक्षता म्हणून एसटी महामंडळाच्या वतीने परभणी जिल्ह्यातील १८०० बसफेऱ्या बुधवारीही रद्द करण्यात आल्या. जिल्ह्यातून एकही बस धावली नाही. त्यामुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागल्याचे दिसून आले. त्यामुळे दोन दिवसात ३६०० बसफेऱ्या महामंडळाने रद्द केल्या.
मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी जिल्ह्यात आठवड्यापासून आंदोलने सुरू आहेत. मंगळवारी महाराष्ट्र बंदचा पाठिंबा म्हणून जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. या पार्श्वभूमीवर मंगळवारी एसटी महामंडळाने काळजी घेत पहाटेपासूनच बसफेऱ्या बंद ठेवल्या होत्या. त्यामुळे परभणी जिल्ह्यात एकही बस धावली नाही. परिणामी प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला. बुधवारी नियमित एसटी महामंडळाच्या बस सुरू होतील, अशी अपेक्षा प्रवाशांना होती. मात्र परभणी शेजारील हिंगोली जिल्ह्यात आजही आंदोलने सुरू असल्याने येथील विभागीय नियंत्रक कार्यालयाच्या वतीने सातही आगारातून एकही बस बाहेर सोडण्यात येणार नाही, असा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे बुधवारी बसस्थानकावर एकही बस लागली नाही. दोन दिवसात एसटी महामंडळाला ७० लाख रुपयांच्या नुकसानीला सामोरे जावे लागल्याची माहिती विभागीय नियंत्रक जालिंदर सिरसाठ यांनी दिली.