फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग जिल्ह्यात वाढला होता. तो आता बऱ्यापैकी कमी झाला आहे. विशेष म्हणजे, पॉझिटिव्हिटी रेट आणि मृत्यूचे प्रमाणही घटल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे. कोरोनातून रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. गुरुवारी दिवसभरात १९७ रुग्णांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नसल्याने रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
आरोग्य विभागाला २ हजार ८०६ नागरिकांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात २१ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. आरटीपीसीआरच्या २ हजार २०४ अहवालांमध्ये १९ आणि रॅपिड टेस्टच्या ६०२ अहवालांमध्ये दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. गुरुवारी दिवसभरात एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
दरम्यान, जिल्ह्यात एकूण ५० हजार ५०४ बाधित रुग्णांची नोंद झाली असून, त्यापैकी ४८ हजार ६९५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. १ हजार २६७ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला. सध्या ५४२ रुग्ण उपचार घेत आहेत.