जिंतूर (जि.परभणी) : तालुक्यातील चिचखेडा येथे २ कोटी २२ लाख रुपये खर्चून बांधलेला बंधारा येलदरी धरणाच्या पाण्याच्या प्रवाहामुळे फुटला असून, २५ गावांतील शेतकऱ्यांना रब्बी हंगामात याचा फटका बसण्याची शक्यता आहे.
येलदरी धरणाच्या पायथ्याला पूर्णा नदी पात्रात पाटबंधारे विभागाने चिंचखेडा, घडोळी तांडा येथे बंधारे बांधले आहेत. या बंधाऱ्यामुळे सावंगी म्हाळसा, हिवरखेडा, सावळी, घडोळी, घडोळी तांडा, गणेशनगर, यनोली, यनोली तांडा, खोलघाडगा, लिंबाळा, लिंबाळा तांडा, तांदळवाडी, मुरूमखेडा, चिंचखेडा, आमदरी, केहाळ आदी गावातील शेकडो हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली आली आहे.
२०११ मध्ये चिंचखेडा येथील बंधाऱ्यावर २ कोटी २२ लाख रुपये खर्च करण्यात आला; परंतु बंधाऱ्याचे काम थातूरमातूर झाले. बंधाऱ्याच्या दरवाजांचे रंगरंगोटीचे काम सुरू असल्याने दरवाजेही बसविले नाहीत. त्यामुळे कोट्यवधी लिटर पाणी वाहून जात आहे. येलदरी धरण १०० टक्के भरल्याने अनेक वेळा पूर्णा नदी पात्रात पाणी सोडण्यात आले. पाण्याच्या प्रवाहाचा ताण सहन न झाल्याने या बंधाऱ्याच्या भिंतीखालील भाग वाहून गेला आहे. त्याचप्रमाणे स्लॅबही वाहून गेला आहे. त्यामुळे रबी सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. बंधाऱ्याच्या अवस्थेकडे लक्ष देण्यास पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांना लक्ष नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे.