पहिल्या व दुसऱ्या लाटेत सर्वसामान्य नागरिकांबरोबर एसटी महामंडळाला एक मोठा फटका बसला आहे. एप्रिल ते जून या तीन महिन्यांत परभणी जिल्ह्यातील पाथरी, गंगाखेड, जिंतूर व परभणी तसेच हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी, वसमत व हिंगोली या सात आगारातील बस सेवा पूर्णतः ठप्प असल्याने तीन महिन्यांत १९ कोटी ७९ लाख ७२ हजार रुपयांचा फटका बसला आहे. १ जूनपासून बस सेवा जिल्ह्यात सुरू झाली असली तरी प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसाद या बसला मिळत नाही. तर दुसरीकडे एसटी महामंडळ प्रशासन हा तोटा भरून काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत असले तरी दिवसेंदिवस एसटी महामंडळाच्या खर्चामध्ये वाढ होत असल्याने हा तोटा भरून काढण्यासाठी अवघड बनले आहे. त्यामुळे किमान एक वर्ष तरी हा तोटा भरून काढणे अवघड झाले आहे.
१०० हून अधिक बसेस आगारात
परभणी येथील विभागीय नियंत्रक कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या सात आगारातील १०० हून अधिक बसेस दुरुस्तीसाठी आगारात पडून आहेत. विशेष म्हणजे प्रशासनाला वरिष्ठ स्तरावरून आवश्यक ते सामान दुरुस्तीसाठी मिळत नसल्याने १५-१५ दिवस दुरुस्तीसाठी पडून राहत आहेत. त्यामुळे याकडे विभागीय नियंत्रक कार्यालयाने लक्ष देऊन आवश्यक ते सामान कार्यशाळेला पुरवावे, अशी मागणी होत आहे.
असा झाला तोटा
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एप्रिल ते जून या तीन महिन्यांत परभणी आगाराला एप्रिल महिन्यात १ कोटी ५ लाख ८४ हजार, मे महिन्यात १ कोटी १५ लाख ८४ हजार तर जून महिन्यात १ कोटी १४ लाख ७७ हजार रुपयांचा फटका बसला आहे. तसेच जिंतूर आगाराला एप्रिल महिन्यात ८१ लाख ५२ हजार, मे महिन्यात ९८ लाख २४ हजार तर जून महिन्यात १ कोटी ७ लाख ६९ हजार रुपयांचा फटका बसला आहे. तसेच गंगाखेड आगाराला एप्रिल महिन्यात ८० लाख ६६ हजार, मे महिन्यात ९१ लाख ८ हजार तर जून महिन्यात १ कोटी ५ लाख ३४ हजार रुपयांचा फटका बसला आहे. तर पाथरी आगाराला एप्रिल महिन्यात ९८ लाख ३१ हजार, मे महिन्यात ९४ लाख ४ हजार तर जून महिन्यात १ कोटी ५ लाख ९४ हजार रुपयांचा फटका बसला आहे.