पाथरी (परभणी ) : कासापुरी येथील सीताराम आगलावे हे बँकेतून ५० हजार काढून परत निघताना एकाने तुमच्या बंडलात फाटक्या नोटा असल्याची थाप मारली. आगलावे नोटांची तपासणी करत असताना हातचलाखी करून दोघांनी त्यातील २० हजार ५०० रुपये पळविल्याची घटना येथील वाल्मिकी बँकेत दुपारी २ वाजता घडली.
रोख रक्कम काढण्यासाठी बँकेत आलेल्या नागरिकांवर नजर ठेवत त्यांनी बोलण्यात गुंतवून रक्कम पळविण्याचे प्रकार शहरात दिवसेंदिवस वाढत आहेत. आज दुपारी कासापुरी येथील सीताराम आगलावे हे येथील वाल्मिकी बँकेत आले. त्यांनी बँकेतून ५० हजार रुपयांची रक्कम काढली. बँकेत नोटा मोजत असताना अचानक दोघेजण त्यांच्या जवळ आले. बंडलात खराब नोटा असल्याचे सांगत त्यांनी आगलावे यांना नोटा मोजण्यासा मदत करतो असे सागितले. काही नोटा खराब आहेत बदलून घ्या असे सांगत त्यांनी आगलावे यांना रोखपालाकडे पाठवले. या दरम्यान, दोघांनी २० हजार ५०० रुपये घेऊन तेथून पोबारा केला.
आगलावे यांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी पाथरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. बँकेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सर्व प्रकार कैद झाला असून पोलीस याच्या आधारावर तपास करत आहेत अशी माहिती पोलीस निरीक्षक डी डी शिंदे यांनी दिली.