पाथरी : नियमबाह्य पद्धतीने साठवणूक केलेल्या वाळू साठ्याची महसूल प्रशासनाने जप्ती करून कारवाई केली़ मात्र जप्त केलेल्या २२ वाळू साठ्यातील तब्बल २ हजार ब्रास वाळू चोरीस गेल्याचा प्रकार समोर आला आहे़. या प्रकरणी संबंधित मंडळ अधिकारी, तलाठी व पोलीस पाटील यांना महसूल विभागाने नोटिसा बजावल्या आहेत़ त्याचबरोबर वाळू साठे करणार्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत़
पाथरी तालुका गतवर्षी अवैध वाळू साठ्याने चांगलाच गाजला होता़ ठेकेदार, पोट ठेकेदार यांनी गोदावरी नदीच्या पात्रालगत, शेतात अवैधरीत्या हजारो ब्रास वाळूचे साठे करून ठेवले होते़ वाळू घाटांच्या लिलावाची वेळ निघून गेल्यानंतर हेच वाळू साठे चढ्या भावाने विक्री करण्याचा धंदा या व्यावसायिकांनी सुरू केला होता़ जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवैध वाळूसाठे असल्याची माहिती जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांना मिळताच त्यांनी तहसीलदारांना या प्रकरणी तातडीने कारवाई करण्याची सूचना दिली होती़ पाथरी तालुक्यात महसूल विभागाच्या वतीने सहा महिन्यांपूर्वी मंडळ अधिकार्यांनी २२ ठिकाणचे अवैध वाळूसाठे जप्त करण्याची कारवाई केली होती़ त्यानंतर ते संबंधित गावच्या पोलीस पाटलांच्या ताब्यात देण्यात आले होते़ त्यानंतर याबाबत करण्यात आलेल्या कारवाईचा अहवाल महसूल प्रशासनाला सादर करण्यात आला होता़ जप्त करण्यात आलेल्या २२ वाळू साठ्यांमध्ये साडेचार हजार ब्रास वाळू होती़ मात्र जप्त वाळू साठ्यांचा लिलाव होण्यापूर्वीच त्यातील २ हजार ब्रास वाळू चोरी गेलीस़ ही बाब जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांच्या लक्षात आली़ त्यांनी याबाबत कारवाईचे आदेश काढले़ यामध्ये मंडळ अधिकारी, तलाठी आणि पोलीस पाटलांना नोटिसाही बजावल्या आहेत़ त्यामुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे़
असे आहेत वाळू साठेजप्त करण्यात आलेल्या २२ वाळूसाठ्यांमध्ये हादगाव कृषी उत्पन्न बाजार समिती गट क्रमांक २१३ मध्ये ९०० ब्रास वाळू साठा होता़ त्यापैकी ४२८ ब्रास वाळू चोरीस गेली आहे़ तसेच हादगाव येथील गट क्रमांक ३३६, २७७ मध्ये १५० ब्रास वाळू जप्त करण्यात आली होती़ या संपूर्ण वाळुची चोरी झाली आहे़ मरडसगाव येथे गट क्रमांक १३१, १३६ व १३८ या तीन ठिकाणी ३५० ब्रास वाळूसाठा जप्त करण्यात आला होता़ त्यातील सर्व वाळू चोरीस गेली आहे़ वरखेड येथील गट क्रमांक १२३ मध्ये ३५० ब्रास वाळू साठा जप्त झाला होता़ या ठिकाणीही संपूर्ण वाळू साठा चोरीस गेला आहे़ मसला येथे ८० ब्रास वाळू जप्त करण्यात आली होती़ त्यातील २० ब्रास वाळू चोरीस गेली आहे़ लिंबा येथील गट क्रमांक १६५ मध्ये ७० ब्रास वाळूसाठा जप्त करण्यात आला होता़ या साठ्यातील सर्वच वाळू गायब झाली आहे़ डाकुपिंप्री येथील महसूल विभागाने जिल्हा प्रशासन दरबारी ८० ब्रास वाळू जप्त केल्याचे दाखविण्यात आले़ मात्र त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने त्या वाळूची तपासणी केली असता, १८८ ब्रास वाळू असल्याचे निदर्शनास आले़ ही सर्व वाळू चोरीस गेली आहे़ तारुगव्हाण येथे दोन ठिकाणी अडीच हजार ब्रास वाळू जप्त करण्यात आली होती़ त्यापैकी ४०० ब्रास वाळुची चोरी झाली असल्याचा अहवाल महसूल प्रशासनाने तयार केला आहे़
गुन्हा दाखल करण्याचे आदेशतालुक्यातील हादगाव आणि बाभळगाव मंडळा अंतर्गत मरडसगाव, वरखेड, मसला, लिंबा, डाकूपिंप्री, हादगाव व तारुगव्हाण या ठिकाणी २२ वाळू साठे जप्त करण्यात आले होते़ मात्र जप्त वाळू साठे कमी झाले आहेत तर काही ठिकाणचे पूर्णत: चोरी झाले आहेत़ सदरचे वाळू साठे अवैध असल्याचे स्पष्ट झाले आहे़ जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार अवैध वाळू उपसा वाहतूक करण्याच्या नावाखाली वाळूसाठाधारक यांच्या सातबारावर बोजा चढवून गुन्हा नोंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत़
जबाबदारी निश्चितीच्या नोटिसाअवैध वाळू साठे जप्त करण्यात आल्यानंतर हे साठे सांभाळण्याची सर्वस्वी जबाबदारी मंडळ अधिकारी, संबंधित गावचे तलाठी आणि पोलीस पाटील यांच्यावर आहे़ १२ मार्च २०१३ या शासन निर्णयाप्रमाणे नियम १४ नुसार अवैध वाळू उत्खनन, वाहतूक ज्या महसूल अधिकारी, कर्मचारी यांच्या कार्यक्षेत्रात उघडकीस येईल त्या अधिकार्यांवर जबाबदारी आणि शिस्तभंगाची कार्यवाहीची तरतूद आहे़ त्या प्रमाणे २२ वाळू साठ्यांत जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने कारवाई का करण्यात येऊ नये, अशा नोटिसा काढण्यात आल्या़
नियमानुसार कारवाईतालुक्यातील जप्त वाळूसाठे सांभाळण्याची जबाबदारी असणार्या मंडळ अधिकारी, तलाठी यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत़ त्यांच्यावर नियमानुसार कारवाई केली जात आहे़ -सी़एस़ कोकणी, उपजिल्हाधिकारी, पाथरी