पाथरी : उपवासासाठी आणलेली भगर व शाबुदाणा यांचे मिश्रण असलेल्या पिठाची भाकरी खाल्ल्याने शहरातील नामदेवनगर येथील एकाच कुटुंबातील १७ जणांना आणि कानसूर येथे चारजणांना विषबाधा झाल्याची घटना २० जुलै रोजी घडली आहे. दरम्यान, सर्व रुग्णांवर पाथरी ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत .
पाथरी शहरातील नामदेवनगर येथील एकाच कुटुंबातील सदस्यांनी बाजारातून शाबुदाणा व भगर यांचे तयार पीठ आणून त्यापासून भाकरी केल्या होत्या. एकादशीनिमित्त या भाकरी खाल्ल्यानंतर या कुटुंबातील काही सदस्य मजुरी कामानिमित्त मानवत तालुक्यातील सावळी, सावरगाव येथे एका शेतात गेले. मात्र, काम सुरू करण्यापूर्वीच त्यांना चक्कर आली. तसेच उलटी व जुलाबाचा त्रास सुरू झाला. यावेळीच घरी थांबलेल्या व्यक्तींनाही असाच त्रास सुरू झाला. त्यामुळे या कुटुंबातील १७ जण एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल झाले. तेथून पुढे त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुमंत वाघ यांनी दिली.
दरम्यान, पाथरी तालुक्यातील कानसूर येथेही एकाच कुटुंबातील दोन पुरुष व दोन महिला अशा चौघांना उपवासाची भगर खाल्ल्यानंतर संध्याकाळी उशिरा चक्कर येणे, उलटी होणे असा त्रास सुरू झाला. त्यांच्यावरही पाथरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
विषबाधा झालेले रुग्ण
मीरा शिवा कसबे, विजयमाला भारत कसबे, कौसाबाई सुदाम कांबळे, संजीवनी केरबा गवारे, मुक्ता सुरेश कांबळे, शीतल सचिन कांबळे, चंद्रकला संतोष कांबळे, समाधान केरबा गवारे, रेखा बाबासाहेब गोरे, संगीता पांडुरंग आडावे, पूजा हनुमान खंडागळे, तानाबाई वामन कांबळे, सुनीता हनुमान खंडागळे, दीपाली संतोष कांबळे (सर्व रा. नामदेवनगर, पाथरी), पदमीनबाई उत्तमराव कदम, बालासाहेब भगवान शिंदे, अरुणा बालासाहेब शिंदे व श्रीकांत बालासाहेब शिंदे (रा. कानसूर, ता. पाथरी).