परभणी : जिल्हा पोलीस दलातील भरती प्रक्रिये दरम्यान पोलीस शिपाई पदासाठी नियुक्त झालेल्या २१ पोलीस शिपाई यांना शनिवारी पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देत त्यांचे पोलीस दलात स्वागत करण्यात आले.
पोलीस दलातील १११ पोलीस शिपाई आणि ३० चालक शिपाई अशा एकूण १४१ पदांसाठीची भरती प्रक्रिया राबविण्यात आली. यामध्ये पोलीस शिपाई पदासाठी ६४६८ पोलीस शिपाई पदासाठी आवेदन प्राप्त झाले होते. यामध्ये १९ जूनपासून भरती प्रक्रियेला सुरुवात झाली. मैदानी चाचणी प्रक्रियेसाठी ३४९५ उमेदवार पात्र झाले होते. त्यानंतर १९ जुलै रोजी लेखी परीक्षा झाली. या परीक्षेस ११९ उमेदवार बसले होते. या सर्व प्रक्रियेतून २४ जुलैला उमेदवारांची तात्पुरती निवड यादी जाहीर करण्यात आली.
कागदपत्र तपासणी, निवड यादी, समांतर आरक्षण अशा सर्व प्रक्रिया पूर्ण करून अखेर १११ पोलीस शिपाईपैकी २१ पोलीस शिपाई यांना शनिवारी नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यामध्ये पाच महिला तर १६ पुरुष कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. शनिवारी झालेल्या नियुक्तीपत्र प्रदान कार्यक्रमास पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्यासह सायबर सेल आणि इतर विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
राज्यात सर्वात पहिले ठरले परभणीपोलीस भरती प्रक्रियेच्या दरम्यान सर्व प्रक्रियेत मैदानी चाचणी लेखी परीक्षा निवड यादी आणि अंतिम यादी अशा सर्व प्रक्रिया पूर्ण करताना परभणी पोलीस दलाने पहिला क्रमांक मिळविला आहे. यात १९ जून ते २४ जुलै या कालावधीत ही प्रक्रिया पूर्ण करून त्यातील पहिल्या २१ पोलीस शिपाई उमेदवारांना शनिवारी नियुक्तीपत्र देण्यात आले. उर्वरित पोलीस शिपाई यांची नियुक्तीपत्र देण्याची प्रक्रिया सुद्धा पुढील काही दिवसात राबविली जाणार आहे.