देवगाव फाटा : सेलू येथील बसस्थानकासमोर बेशुद्ध अवस्थेत रात्रभर पडलेल्या एका वृद्धास रुग्णवाहिकेतून उपजिल्हा रुग्णालयात दाखल करीत पोलिसांनी त्याचे प्राण वाचविले. या घटनेतून खाकी वर्दीतील माणसुकीचा हा प्रत्यय सेलूकरांना आला.
परभणी येथील ज्ञानेश्वर नगरमधील बाबुराव लिंबाजी काळे हे वृद्ध ५ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजेपासून सेलू बसस्थानकासमोरील रस्त्यावर शुद्ध हरपलेल्या अवस्थेत पडले होते. बाजूला पिशवीत वांगी, टोमॅटो आणि पाण्याची बाटलीही पडलेली होती. रात्र गेली. दुसऱ्या दिवशी दुपार झाली. परंतु, ते शुद्धीवर येत नसल्याने नागरिकांनी ६ डिसेंबर रोजी दुपारी ही माहिती सहायक पोलीस निरीक्षक विजय रामोड यांना दिली. रामोड यांनी पोलीस नाईक उमेश बारहाते यांना रुग्णवाहिकेसह घटनास्थळी पाठविले. बारहाते व बालू काळे यांनी तातडीने या वृद्धास जिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी केलेल्या उपचारानंतर एक तासाने हा वृद्ध शुद्धीवर आला. त्यानंतर त्याने बाबुराव लिंबाजी काळे असे नाव असल्याचे सांगितले. परभणी येथील रहिवासी असून नातीचे लग्न असल्याचे त्यांनी सांगितले. हा वृद्ध दारुचे अतिसेवन केल्याने बेशुद्ध अवस्थेत पडला होता. आणखी काही तास तो असाच पडून राहिला असता तर त्याच्या जीवितास धोका निर्माण झाला असता, असे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. खाकी वर्दीतील माणुसकीमुळेच या वृद्धास जीवदान मिळाले आहे.