पूर्णा (परभणी) : आज दुपारी तालुक्यातील 22 गावात पावसासह मोठ्याप्रमाणावर गारपीट झाली. यात एका महिलेचा मृत्यू झाला असून रब्बी पिके व फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे.
मागील दोन दिवसांपासून तालुक्यातील विविध भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. आज दुपारी 4 वाजण्याच्या चुडावा, धनगर टाकळी, निळा, कंठेशवर , गोळेगाव, मुंबर,महागाव, यासह तालुक्यातील 22 गावात गारपीट झाली. चुडावा परिसरात गारपिटीचे प्रमाण जास्त आहे. येथे गारपीटीपासून बचावासाठी गोठ्यात थांबलेल्या भगीरथीबाई पांडुरंग कांबळे यांचा गोठा अंगावर कोसळ्याने मृत्यू झाला. यासोबतच १२ नागरिक व अनेक जनावरे यात जखमी झाली आहेत.
पिकांचे मोठे नुकसान काढणीस आलेला गहू, ज्वारी, हरभरा या पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. गौर, चुडावा, गोळेगाव, पांगारा, लोखनडे पिंपळा, पिंपळा या परिसरात संत्रा-मोसंबीच्या फळबागांचे नुकसान झाले तर आंब्याना आलेला मोहर या तडाख्यात पूर्णपणे गळून गेला आहे. यानंतर चुडावा येथे तहसीलदार श्याम मंदनूरकर यांनी नुकसानीची पाहणी केली.