जिंतूर तालुक्यामध्ये ऊसतोड कामगारांची संख्या प्रचंड आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर तालुक्यातील कामगार कामानिमित्त मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक या भागात गेला आहे. या कामगारांशी संपर्क करून मतदानासाठी गावी आणण्याकरिता अनेक उमेदवारांनी लाखोंचा खर्च केला. तालुक्यामध्ये किमान १ हजार जीप, १०० पेक्षा जास्त ट्रॅव्हल्स व ट्रक, तसेच टेम्पोच्या माध्यमातून मतदारांना देण्यात आले. विशेष बाब म्हणजे, या मतदारांना जाण्या-येण्याच्या खर्चासह जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. तालुक्यातील छोट्या ग्रामपंचायतीमध्ये हा प्रकार सर्रास दिसला. विशेष म्हणजे, या ग्रामपंचायतीचे मतदान ९० टक्क्यांपेक्षा जास्त झाले आहेत. ज्या ग्रामपंचायतीमध्ये ऊसतोड कामगार मोठ्या प्रमाणावर आणण्यात आले. परिणामी, ग्रामपंचायतीच्या मतदानाची टक्केवारी प्रचंड वाढली. या मजुरांना रोख स्वरूपात रक्कम देण्यात आली, परंतु काही गावांमध्ये मतदानासाठी आल्यानंतर ठरविलेल्या रकमेपेक्षा कमी रक्कम दिल्याने किरकोळ बाचाबाचीचे प्रकारही झाले. ऊसतोड कामगारांच्या मतदानावरच तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या उमेदवाराचे भवितव्य अवलंबून आहे.
२२ हजार ऊसतोड कामगार मतदानासाठी जिंतुरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 4:15 AM