येलदरी (परभणी ) : जिंतूर आगाराची जिंतूर-रिसोड ही बस रिसोडहून जिंतूरकडे येत असताना येलदरी धरणाजवळील अरूंद पुलावर पलटी झाल्याने २३ प्रवासी जखमी झाले आहेत. १७ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. जखमींपैकी ५ ते ६ प्रवासी गंभीर असून त्यांना जिंतूरच्या ग्रामीण रुग्णालयात हलविले आहे.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी- १७ जानेवारी रोजी सायंकाळी जिंतूर आगाराची रिसोड जिंतूर ही बस जिंतूरकडे येत होती. येलदरी धरणाजवळ मोठा घाट असून रस्ता अरुंद आहे. तसेच पूर्णा नदीवरील पुलाला कठडेही नाहीत. ही बस ऐन पुलाजवळ आल्यानंतर बसचे ब्रेक फेल झाले. गाडी उताराला थांबत नसल्याने चालक नारायण दादाराव भोपाळे यांनी ही बस रस्त्याच्या कडेला असलेल्या टेकडीकडे वळविली. आणि तेथेच ही गाडी पलटी झाली. बसमध्ये २३ प्रवासी होते. या प्रवाशांसह चालक भोपळे, वाहक ए.आय. पठाण जखमी झाले आहेत.
अपघाताची घटना समजताच येलदरी, सावंगी म्हाळसा येथील ग्रामस्थ मदतीसाठी धावले. उपसरपंच प्रमोद चव्हाण यांनी माजी आ. बोर्डीकर यांच्याकडील रुग्णवाहिकेस बोलावून या रुग्णवाहिकेद्वारे जखमींना जिंतूर येथील प्राथमिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तहसीलदास सुरेश शेजूळ यांनी घटनास्थळी भेट दिली. येलदरी येथील महेंद्र लाटे, अनिल चव्हाण, शेख जिया, प्रमोद चव्हाण, बाळू आवताडे, राम बलगे, शेषराव चव्हाण, सुरेश वाकळे, रमाकांत जैयस्वाल आदींनी मदतकार्य केले.
यापूर्वीही अनेक वेळा अपघातयेलदरी धरणासमोरील पूर्णा नदीवरील पूल अरुंद असून या पुलाला कठडेही नाहीत. या ठिकाणी यापूर्वी अपघात होऊन अनेकांना प्राण गमवावे लागले. गुरुवारी बसचालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळला.
पहा व्हिडिओ :