परभणी : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने आरोग्य विभागातील मनुष्यबळ वाढविण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या पुढाकारातून एकाच दिवसात २३६ आरोग्य कर्मचाऱ्यांना कंत्राटी स्वरूपात नियुक्ती आदेश देण्यात आले आहेत.
महिनाभरापासून कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. दुसऱ्या बाजूला आरोग्य यंत्रणाही सक्षम असणे गरजेचे आहे. आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांची यादी मोठ्या प्रमाणात आहे. रुग्ण संख्या वाढल्याने रग्णांना योग्य ती सेवा मिळावी, या उद्देशाने कर्मचारी भरती करणे आवश्यक होते. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी कंत्राटी स्वरूपात आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे, एका दिवसातच २३६ कर्मचाऱ्यांना नियुक्ती आदेश देण्यात आले आहेत. कंत्राटी स्वरूपात का होईना; परंतु आरोग्य विभागाला आता बऱ्यापैकी मनुष्यबळ प्राप्त झाले असून, जिल्ह्यातील कोरोना रुग्णालयासह कोविड केअर सेंटरमध्ये या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने तालुकास्तरावरील कोविड केअर सेंटर बंद करण्यात आले होते. या ठिकाणी नियुक्त असलेल्या कर्मचाऱ्यांचे कामही थांबविण्यात आले होते. परंतु आता पुन्हा संसर्ग वाढत असल्याने सर्वच तालुकास्तरावरील कोविड केअर सेंटरमध्ये नव्याने कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जि. प. सीईओ शिवानंद टाकसाळे यांच्या निर्णयामुळे पुन्हा एकदा तालुकास्तरावरील कोविड केअर सेंटरमध्ये मनुष्यबळ उपलब्ध झाले आहे.
कुठे दिल्या कर्मचाऱ्यांना नियुक्त्या?
परभणी शहरातील आयटीआय येथील कोरोना हॉस्पिटलमध्ये ९७ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मॅटर्निटी वॉर्डमध्ये ७, कोरोना प्रयोगशाळेत १७, वाॅर रूममध्ये ६, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील कोरोना केअर सेंटरमध्ये २, सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात १४, गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात २१, जिंतूर येथील कोरोना केअर सेंटरमध्ये ८, मानवत ५, पाथरी ५, सोनपेठ १२, पालम ९, पूर्णा १५ आणि परभणी शहरातील अक्षदा मंगल कार्यालयाच्या कोरोना केअर सेंटरमध्ये १८ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
वैद्यकीय अधिकाऱ्यांसह इतर अनेक पदे...
कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांसह इतर १३ पदांवर कर्मचाऱ्यांना नियुक्ती देण्यात आली आहे. एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी २, विशेष वैद्यकीय अधिकारी ५, आयुष वैद्यकीय अधिकारी ११, दंतरोग वैद्यकीय अधिकारी ८, बीयूएमएस वैद्यकीय अधिकारी १, परिचारिका १०१, औषध निर्माता ८, प्रयोगशाळा तंत्रज्ञ ११, क्ष-किरण तंत्रज्ञ ४, ईसीजी तंत्रज्ञ २, इलेक्ट्रिशियन १ आणि ६७ स्वीपर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.