पाथरी - मराठा समाजाला आरक्षण मिळावे, म्हणत एका 28 वर्षीय मराठा तरुणांने मृत्यूला कवटाळल्याची धक्कादायक घटना पाथरी तालुक्यातील वडी येथे 23 ऑक्टोबर रोजी घडली आहे. याप्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे.
पाथरी तालुक्यातील वडी येथील सोमेश्वर उत्तमराव शिंदे (वय 28) असे आत्महत्या केलेल्या मराठा तरुणाचे नाव आहे. घरची परिस्थिती हालकीचे असल्याने सोमेश्वर वडी गावात सालगडी म्हणून काम करत होता. सोमवार(23 ऑक्टोबर) रोजी दुपारी गावातील एका विहिरीत त्याचा मृतदेह आढळला आहे. घटनास्थळी त्याच्या मोबाईलच्या बॅक कव्हरमध्ये एका कागदावर मराठ्यांना आरक्षण व सततची नापिकी यामुळे आत्महत्या करत असल्याचा मजकूर आढळला असल्याचे पाथरी पोलिसांनी सांगितले आहे.
सोमेश्वर शिंदे हा आपल्या मित्रासोबत रात्री शेतात होता, 12 च्या सुमारास कोणालाही न सांगता तो तेथून निघून गेला. हा प्रकार मित्रांच्या सकाळी लक्ष्यात आला. गाव परिसरात सर्वत्र शोध घेण्यात आला, मात्र तो सापडला नाही. शेवटी शेतातील विहिरीकडे शोध घेतला असता त्या ठिकाणी त्याचा मोबाईल आढळून आला. त्यानंतर विहिरीत शोध घेतला असता त्याचा मृतदेह आढळला. पोलीस निरीक्षक सुकाळे यांच्याशी संपर्क साधला असता मराठा आरक्षण आणि नापिकी मुळे आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी सापडल्याची माहिती त्यांनी दिली. घटनेची माहिती कळताच पाथरी पोलीस ठाण्यामध्ये मराठा बांधवांनी गर्दी केली होती.