देवगावफाटा: सेलू तालुक्यात राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या वालूर, देऊळगाव गात यासह जवळपास १० ग्रा.पं.चा समावेश आहे. या ग्रा.पं.मध्ये या दहाही ग्रामपंचायतींमध्ये २० हून अधिक उमेदवार रिंगणात असून आपले नशीब अजमावत आहेत. त्यामुळे या ग्रा.पं.च्या निकालाकडे गावासह तालुक्याचे लक्ष लागले आहे.
सेलूू तालुक्यातील ६७ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी २०५ वाॅर्डात ५१९ सदस्य निवडले जाणार आहेत. यासाठी १ हजार ३०२ नामनिर्देशन अर्ज दाखल झाले होते. गुरुवारी झालेल्या छाननीत ७ ग्रामपंचायतींचे १२ नामनिर्देशन अर्ज आक्षेप व विविध कारणांमुळे निवडणूक निर्वाचन अधिकारी यांनी अवैध ठरविले आहे. त्यामुळे १ हजार २९० अर्ज वैध ठरले आहेत. वैध नामनिर्देशन अर्जाची सद्यस्थिती लक्षात घेता तालुक्यातील ६८ पैकी ८ ग्रामपंचायती या बिनविरोध निवडल्या जाणार आहेत. तर २८ ग्रामपंचायतीमध्ये तिरंगी लढत तसेच ३२ ग्रामपंचायतींमध्ये दुरंगी लढत होण्याची शक्यता आहे.
राजकीय दृष्टिकोनातून १० ग्रा.पं. मध्ये चुरस
सेलू तालुक्यात राजकीय दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये वालूर येथे ५३, देऊळगाव गात येथे ४०, आहेरबोरगाव येथे २३, हादगाव खु. २६, मोरेगाव २४, देगाव फाटा १७, चिकलठाणा २७, कुंडी ३१, रायपूर २८, शिराळा २७, सिमनगाव येथे २२ उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. त्यामुळे या ग्रामपंचायतींच्या निकालाकडे गावकऱ्यांसह तालुकावासीयांचे लक्ष लागले आहे.