शहरातील काही पॅथलाॅजींना भेट दिली तेव्हा शासकीय दरपत्रक दर्शनी भागात लावल्याचे दिसून आले. या ठिकाणी सिटी स्कॅनसाठी रुग्णांची संख्याही अधिक होती. मागील आठवड्यात सिटी स्कॅनच्या दरांबाबत ओरड झाली. जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश देऊन शासकीय दराने सिटी स्कॅनचे आदेश दिले. त्यानंतरही काही सेंटरर्सविषयी नागरिकांच्या तक्रारी असून, जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी तपासणीचे आदेश दिले आहेत.
२० पटीने वाढल्या एचआरसीटी टेस्क
पूर्वी दम्याच्या रुग्णांचीच एचआरसीटी तपासणी केली जात होती. मात्र आता कोरोनाबाधित रुग्णांच्या फुफ्फुसात किती प्रमाणात संसर्ग आहे, हे तपासण्यासाठी एचआरसीटी करण्याचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यात एचआरसीटी तपासण्या करण्याचे प्रमाण जिल्ह्यात २० टक्क्यांनी वाढले आहे.
सिटी स्कॅन तपासणीसाठी मोठा खर्च येतो. कमी तपासण्या कमी किमतीत ही तपासणी करणे अवघड आहे. मात्र तपासण्यांची संख्या वाढल्याने आणि जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिल्याने सर्वांनीच शासकीय दराने एचआरसीटी तपासणी सुरू केली आहे. त्यामुळे आता कुठेही अधिक रक्कम घेतली जात नाही. परंतु कोणाच्या तक्रारी असतील तर संघटनेशी संपर्क साधावा.
डॉ. नंदकिशोर भक्कड, अध्यक्ष, रेडिओलॉजिस्ट असोसिएशन
पॅथॉलॉजी लॅबच्या तपासणीचे आदेश
शहरातील गव्हाणे रोड भागातील पोरवाल डायग्नोस्टिक सेंटरमध्ये १४ व १५ मार्च रोजी केलेल्या सिटी स्कॅनसाठी शासकीय दरापेक्षा अधिक रक्कम घेतल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती. त्यावरून याप्रकरणी योग्य ती कारवाई करून दोन दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी मंजूषा मुथा यांनी ६ एप्रिल रोजी जिल्हा शल्य चिकित्सकांना दिले आहेत.