परभणी : प्राथमिक स्तरावर दर्जेदार सुविधा अन् शिक्षण मिळाले तर नक्कीच संबंधित विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्वल राहू शकतेण परंतु शहरासह ग्रामीण भागातील परिस्थिती बिकट असून जिल्ह्यातील पावणेचारशे अंगणवाड्यांना स्वतःची इमारत नसल्यामुळे पर्यायी जागेवर यंत्रणेला शिक्षणाची व्यवस्था करावी लागत असल्याची स्थिती आहे. जिल्ह्यात कुठे अंगणवाडीला जागा नाही तर कुठे निधी मिळत नसल्याने संबंधित विद्यार्थ्यांसह पालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. निधीसाठी प्रस्ताव पाठवून सुद्धा तो मान्य होत नसल्याने प्रशासकीय स्तरावर पण अडचणींचा डोंगर पुढे येत आहे.
जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागअंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या माध्यमातून एक हजार ६९० ठिकाणी अंगणवाडीच्या माध्यमातून लहान बालकांना शिक्षणाचे धडे दिले जातात. परंतु यातील ३७४ ठिकाणी अंगणवाडींना स्वतःची इमारत नसल्यामुळे पर्यायी जागा भाडे तत्वावर घेऊन त्या ठिकाणी अंगणवाडी सेविका, मदतनीस संबंधित मुलांना ज्ञानार्जनाचे धडे देत आहे. यात कुठे इमारतीसाठी जागा मिळत नाही तर वारंवार प्रस्ताव पाठवून देखील जागा आहे, पण निधी मिळत नसल्याने स्थानिक पातळीवर अनेक अडचणींचा सामना अंगणवाडी सेविकेसह मदतनीस यांना करावा लागत असल्याची स्थिती आहे. यासाठी अपेक्षित निधी द्यावा, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या संबंधित यंत्रणेमार्फत शासनाकडे करण्यात आली आहे. परंतु याकडे दुर्लक्ष होत असल्याने विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
कुठे जागा नाही तर कुठे निधीचा अभावजिल्ह्यातील अंगणवाडींचा इमारत नसलेल्या केंद्रांची संख्या ३७४ असून त्यापैकी २८८ ठिकाणी बांधकामासाठी स्थानिक पातळीवर जागा प्राप्त झालेली आहे. परंतु वारंवार प्रस्ताव पाठवून सुद्धा अपेक्षित निधी मिळत नसल्यामुळे इमारतीचे बांधकाम होत नसल्याची स्थिती आहे. तर दुसरीकडे १७५ ठिकाणी शाळेत अंगणवाड्या भरविण्यात येत असून ८६ ठिकाणी शासकीय इमारतीत अंगणवाडीचे कामकाज चालते. ४३ ठिकाणी खाजगी इमारत भाडेतत्त्वावर घेऊन विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात असल्याची स्थिती आहे.
दीडशे पदे रिक्तजिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागअंतर्गत एकूण एक हजार ६९० अंगणवाडीचे कामकाज चालते. संबंधित अंगणवाडीचे कामकाजासाठी महिला व बाल विकासविभागाच्या माध्यमातून एक हजार ५४४ पदे भरण्यात आली असून अंगणवाडी मदतनीस यांचे १४६ पदे रिक्त असल्याने ते आगामी काळात भरण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू आहेत.
दुरुस्तीची काहींना गरजजिल्ह्यातील एक हजार ३१६ अंगणवाड्यांना स्वत:ची इमारत असल्याची माहिती पुढे आली आहे. परंतु, यातील बहुतांश इमारतीचे बांधकाम जुने झाल्याने त्याठिकाणी दुरुस्ती करण्याची गरज असल्याची स्थिती आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणेच्या माध्यमातून अशा अंगणवाड्याचा शोध घेणेसुद्धा आवश्यक आहे.
तालुकानिहाय इमारत नसलेल्या अंगणवाड्यागंगाखेड ६७पाथरी २१परभणी ६२जिंतूर ६८पालम ५९पूर्णा २४सेलू ३७मानवत ०६सोनपेठ २८एकूण ३७४