परभणी : ‘गाळ मुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेंतर्गत जिंतूर तालुक्यातील २१ तलावांतून आतापर्यंत ३ लाख १० हजार ७३५ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे़ यामुळे या तलावामध्ये पाणीसाठा वाढणार असून, शेतकऱ्यांच्या जमिनीही सुपिक होण्यास मदत होणार आहे.
जिंतूर तालुक्यातील बहुतांश भाग हा डोंगराळ आहे़ जमीन मुरमाड व खडकाळ असून, शेती करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत़ तालुक्यात तलावांची संख्याही बऱ्यापैकी असून, या तलावामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे़ परिणामी पाणीसाठ्यामध्ये घट होत आहे़ तलावातील साचलेला गाळ काढून शेतामध्ये टाकल्यास उत्पादनामध्ये भर होईन पाणीसाठ्यामध्येही वाढ होऊ शकते़ त्यामुळे शासनाने सुरू केलेल्या ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ या योजनेंतर्गत तालुक्यातील तलावातील गाळ काढण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला़
गाळ काढण्यासाठी जनजागृती करणाऱ्या अनुलोम संस्थेच्या माध्यमातून जिंतूर तालुक्यातील २१ तलावांतील साठलेला गाळ काढण्याच्या कामास गती देण्यात आली आहे़ आतापर्यंत जिंतूर तालुक्यातील २१ तलावांतील ३ लाख १० हजार ७३५ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे़. यामध्ये दहेगाव येथील लघुसिंचन विभाग व जिल्हा परिषदेंतर्गत येणाऱ्या तलावातून, पुंगळा, रायखेडा, कवडा, जांभरून, मानमोडी, जांब खु़, जांब बु ़,चिंचोली काळे, साखरतळा, डोंगरतळा, भोगाव देवी, संक्राळा, बामणी, भोसी, वडाळी, यनोली तांडा, मानधनी येथील तलावातील गाळाचा समावेश आहे़ या २१ तलावांतून ३ लाख १० हजार ७३५ घनमीटर गाळ काढून ३ हजार १०७ एकरवर हा गाळ टाकण्यात आला आहे़ शेतकऱ्यांचाही याला प्रतीसाद मिळत असून ट्रॅक्टरच्या सहाय्याने तलावतील गाळ नेला जात आहे़
सध्या हे काम जोमात सुरूच आहे़ त्यामुळे तलावामध्ये पाणीसाठ्यात वाढ होऊन जमीनही कसदार होणार आहे़ याचा फायदा शेतकऱ्यांनाच होणार असून, पिकांना पाणीही उपलब्ध होणार आहे़ त्यामुळे तलावतील गाळ आपल्या शेतामध्ये टाकावा, असे आवाहनही प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे़
शासनाकडून मिळणार इंधन खर्चगाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेंतर्गत शासनाच्या वतीने गाळ काढण्याच्या उपक्रमास जिंतूर तालुक्यात गती आली आहे़ या अंतर्गत काढलेला गाळ लोकसहभागातून शेतकरी आपल्या शेतामध्ये घेऊन जात आहेत़ तलावातील गाळ जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात येत असून, यासाठी शासनाच्या वतीने एक क्युबिक मीटर (घनमीटर) गाळ काढण्यासाठी जेसीबी मशीनचा इंधन खर्च म्हणून ११़९० रुपये निधी देण्यात येत आहे़ त्यामुळे तलावातील जास्तीत जास्त गाळ काढून शेतकऱ्यांनी जमिनी सुपिक बनवाव्यात, असे आवाहन अनुलोप संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे़
पाणीसाठ्यात वाढ होईल गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेंतर्गत गाळ काढण्याचे काम सुरू आहे़ त्यामुळे शेती सुपिक होवून पाणीसाठ्यात वाढ होण्यास मदत होणार आहे़ शेतकऱ्यांनी या योजनेतून गाळ काढून आपल्या शेतात टाकावा़ - सुरेश शेजूळ, तहसीलदार, जिंतूर