लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने तरुणांमध्ये दिवसेंदिवस कर्करोगाचे प्रमाण वाढत चालले आहे. डिसेंबर २०१७ अखेरपर्यंत जिल्हाभरात साडे पाच लाख नागरिकांच्या तपासणीत ३०५ रुग्ण संशयित आढळून आल्याची माहिती तंबाखू नियंत्रण कक्षाचे जिल्हा सल्लागार शाम गमे सोन्नेकर यांनी दिली.जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस तरुणांमध्ये तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करण्याची सवय वाढत चालली आहे. तंबाखूचे सेवन करणाºया व्यक्तीमध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. येथील जिल्हा सामान्य रुग्णांतर्गत जिल्ह्यातील विविध आरोग्य संस्थांच्या माध्यमातून ३० वर्षावरील ५९ हजार ५० पुरुष आणि ६५ हजार ५३९ महिलांची कर्करोग विषयक तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये ६६ रुग्णांना तोंड उघडण्याचा त्रास आढळला. १३३ रुग्णांवर पांढरा किंवा लाल चट्टा आढळून आलेला आहे. ९० जणांची त्वचा जाडसर असल्याचे आढळले आहे. तर १५ रुग्णांना १५ दिवसांपेक्षा अधिक काळ बरा न होणारा व्रण आढळून आला आहे. जिल्हा आरोग्य विभागाने केलेल्या मूख स्वास्थ्य तपासणीमध्ये ही माहिती पुढे आली आहे. एकंदर व्यसनाधिनतेचे प्रमाण वाढत चालले असून कर्करोगाच्या रुग्णांमध्येही वाढ होत आहे. तंबाखूसेवन, धुम्रपान करणे या बरोबरच दैनंदिन जीवनशैलीमध्ये झालेले बदल कर्करोग वाढीसाठी कारणीभूत ठरत आहेत. कर्करोग नियंत्रण करण्यासाठी शासनपातळीवर ठोस उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.मित्रांच्या मदतीने कर्करोगावर केली मातपरभणी येथील युवा पत्रकार शिवाजी क्षीरसागर यांना दोन वर्षांपूर्वी कर्करोग झाल्याचे निष्पन्न झाले. पहिल्याच स्तरामध्ये हा आजार झाल्याचे समोर आल्यानंतर क्षीरसागर यांच्या मित्र परिवाराने वेळीच निर्णय घेत योग्य पाऊले उचलली. योग्य उपचारही मिळाले. यात शिवाजी क्षीरसागर यांच्या खंबीर मनाचेही पाठबळ मिळाले आणि आज या युवकाने जिद्दीने कर्करोगावर मात केली आहे.औषधोपचारांकडे शासनाचे दुर्लक्षकर्करोग झाल्यानंतर रुग्णांवर योग्य उपचार व्हावेत, यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी, पंतप्रधान सहाय्यता निधीतून मदत मिळते. यातून रुग्णांवर उपचारही होतात. परंतु, या उपचारानंतर रुग्णांना आयुष्यभरासाठी औषधोपचार घ्यावा लागतो. या औषधींचा खर्च वर्षाकाठी काही लाखांचा आहे. औषधोपचारासाठी मात्र शासन कुठलीही मदत देत नाही. त्यामुळे रुग्णांसमोरील अडचणीत वाढ होते. शासन इतर आजारांसाठी मोफत औषधी उपलब्ध करुन देते. त्याच धर्तीवर कर्करोगाचे औषधही मोफत द्यावे, अशी मागणी होत आहे.
परभणी जिल्ह्यात ३०५ संशयित रुग्ण: तरुणांमध्ये वाढतेय कर्करोगाचे प्रमाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2018 12:16 AM