जिंतूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असणाऱ्या गावांत कुष्ठरोग व क्षयरोग निर्मूलन मोहीम राबविण्यात येत आहे. या सर्वेक्षणासाठी तालुक्यात एकूण २५१ आरोग्य पथकांची नेमणूक केली आहे. प्रत्येक गावात जाऊन ही पथके दररोज २० ते ३० घरांना प्रत्यक्ष भेट देऊन सर्वेक्षण करत आहेत. १ डिसेंबरपासून सुरू करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये २ लाख ६२ हजार नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात येणार असून, आतापर्यंत ९० हजार नागरिकांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. यामध्ये कुष्ठरोगाचे ११७ तर क्षयरोगाचे २१२ असे एकूण ३२९ संशयित रुग्ण आढळले आहेत. अजूनही दीड लाखापेक्षा जास्त नागरिकांचे सर्वेक्षण करणे बाकी असून, यामध्ये आणखी संशयित रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सर्व्हेक्षणात आढळलेल्या रुग्णांना घेऊन त्यांना उपचारासाठी मार्गदर्शन करत आहेत. या आजाराबाबत जनजागृती करणार असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दिनेश बोराळकर यांनी सांगितले.
कुष्ठरोग, क्षयरोगाची ही आहेत लक्षणे
अंगावर फिकट लालसर चट्टा उमटणे, चकाकणारी तेलकट त्वचा होणे, अंगावर गाठी येणे, हातापायांना बधिरता येणे, शारीरिक विकृती, यासारखी लक्षणे दिसून येतात अशी लक्षणे आढळून आल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा. तसेच दोन आठवड्यांपेक्षा अधिक कालावधीचा खोकला, ताप येणे, भूक मंदावणे, शारीरिक वजनात लक्षणीय घट होणे, मानेवर गाठ येणे यासारखी लक्षणे आढळून आल्यास रुग्णांनी त्वरित आरोग्य पथकाला कळविणे आवश्यक असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
९ दिवस चालणार सर्व्हेक्षण
जिंतूर तालुक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच वाघी बोबडे, जोगवाडा येथील दोन प्राथमिक आरोग्य पथके, ३६ प्राथमिक उपकेंद्र, बामणी येथील १ आयुर्वेदिक रुग्णालय या सर्व ठिकाणी २५१ पथकांची नियुक्ती करून क्षयरोग, कुष्ठरोग रुग्णांचे सर्वेक्षण सुरू असल्याची माहिती तालुका आरोग्य प्रशासनाने दिली.