परभणी : कोरोनाचा संसर्ग वाढत असून, रविवारी ३३ नवीन रुग्णांची भर पडली आहे, तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. दोन आठवड्यांपासून कोरोनाची परिस्थिती बदलली असून, रुग्णांची संख्या वाढत आहे. मागील आठवड्यात दररोज सरासरी १५ ते २० रुग्ण होत होते. त्यात ही संख्या आता ३० च्याही पुढे सरकली आहे. रविवारी ७६९ नागरिकांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात आरटीपीसीआरच्या ७०३ अहवालांमध्ये २६, तर रॅपिड टेस्टच्या ६६ अहवालांमध्ये सातजण पॉझिटिव्ह आढळले आहेत. शहरातील खासगी रुग्णलायात उपचार घेणाऱ्या एका पुरुषाचा रविवारी मृत्यू झाला. जिल्ह्यात कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या ८ हजार ५४८ झाली असून, ८ हजार २८ रुग्ण कोरेानामुक्त झाले आहेत. ३२५ रुग्णांचा मृत्यू झाला असून, १९५ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. शहरातील आयटीआय हॉस्पिटलमध्ये ४९, खासगी रुग्णालयात ६२ रुग्ण उपचार घेत आहेत, तर ८६ रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरू आहेत.
या तालुक्यांत आढळले रुग्ण
रविवारी सेलू तालुक्यात सहा रुग्णांची नोंद झाली आहे. जिंतूर तालुक्यात दोन, परभणी तालुक्यात २१, पूर्णा तालुक्यात एका रुग्णाची नोंद झाली. त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्यातील एक आणि हिंगोली जिल्ह्यातील दोन रुग्ण परभणीत पॉझिटिव्ह झाले आहेत.