१ लाख ३६ हजार अहवाल निगेटिव्ह
परभणी : जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४७ हजार २१६ जणांचे कोरोनाच्या अनुषंगाने नमुने घेण्यात आले होते. त्यापैकी १ लाख ३६ हजार ४८४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १० हजार १५२ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. स्वॅब नमुने घेतलेल्यापैकी ५९३ जणांचे अहवाल अनिर्णायक ठेवण्यात आले असून, १४० जणांचे स्वॅब नाकारण्यात आले आहेत.
शासकीय हरभरा खरेदी केंद्र सुरू
जिंतूर : येथे शासकीय हरभरा खरेदी केंद्र नाफेडच्यावतीने सुरू करण्यात आले आहे. जिंतूर जिनिंग व प्रेसिंग येथे हे केंद्र सुरू झाले असून, बुधवारी या केंद्राचे नाफेडचे स्थानिक केंद्र संचालक समीर दुधगावकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी शेतकरी गंगाराम आव्हाड, जिंतूर जिनिंग सोसायटीचे उपाध्यक्ष बबनराव घुगे, व्यवस्थापक दिलीप जाधव, नंदकुमार महाजन, नावीद भाई, रामप्रसाद डोंबे, अतुल राऊत, सुनील बोरूडे आदी उपस्थित होते.
निवडणुकीमुळे पदाधिकारी गायब
परभणी : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी रविवारी मतदान होणार असल्याने ग्रामीण भागातील नेतेमंडळी या निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत. त्यामुळे शुक्रवारी जिल्हा परिषदेत नेतेमंडळी गायब असल्याचे दिसून आले. मोजकेच जि.प.चे सदस्य या परिसरात पाहावयास मिळाले. विशेष म्हणजे काही प्रमुख अधिकारीही दुपारी १.३० च्या सुमारास दिसून आले नाहीत. त्यामुळे विविध कामानिमित्त आलेल्या नागरिकांना परतावे लागले. प्रमुख अधिकारीच गायब असल्याने आश्चर्य व्यक्त केले गेले.
अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले
पाथरी : सेलू तालुक्यातील खवणे पिंप्री येथील एका अल्पवयीन मुलीस गजानन धोंडिबा आरडे या ३५ वर्षीय व्यक्तीने पळवून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सदरील मुलीच्या नातेवाईकांनी पाथरी पोलीस ठाण्यात गुरुवारी फिर्याद दिली. त्यावरून आरोपी गजानन आरडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक चिरंजीव दलालवाड करत आहेत.