गंगाखेड : तालुक्यात वाळूमाफियांचा धुमाकूळ या आशयाचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित करताच महसूल प्रशासन खडबडून जागे झाले असून, शनिवारी धारासूर, मैराळ सावंगी, गौंडगाव या शिवारात नदीपात्रातील तराफे जाळून ३५ ब्रास वाळू जप्त करण्यात आली.
वाळू धक्क्यांचे लिलाव झाले नसल्याने मैराळ सावंगी, गौंडगाव, धारासूर परिसरातील गोदावरीच्या नदीपात्रातून रात्रीच्या वेळी वाळू चोरून उपसा करून विनापरवाना वाहतूक केली जात आहे. या प्रकरणी ‘लोकमत’ने शनिवारी वृत्त प्रसिद्ध केले. त्यानंतर तहसीलदार स्वरूप कंकाळ, मंडल अधिकारी शंकर राठोड, तलाठी अक्षय नेमाडे, रूपेश मुलंगे, आदींच्या पथकाने धारासूर परिसरात गोदावरी नदीतील खडक बंधाऱ्याच्या खालील बाजूस पाहणी केली. तेव्हा नदीपात्रातून वाळू उपसा करण्यासाठी थर्माकोलच्या तराफ्याचा वापर केला जात असल्याचे निदर्शनास आले. पथकाने हा तराफा जाळून नष्ट केला. मैराळ सावंगी येथील रस्त्याच्या बाजूला साठवून ठेवलेली दोन ब्रास वाळू जप्त करण्यात आली. तसेच गौंडगाव रस्त्यावरून नदीपात्रातून वाळूचा उपसा केल्याचे ट्रॅक्टरच्या टायरच्या खुणांवरून स्पष्ट झाले. त्यामुळे या भागात पाहणी केली असता, सुमारे ३५ ब्रास वाळूचे लहान-मोठे १४ साठे जप्त करण्यात आले. या परिसरातून वाळू उपसा होत असल्याने पात्राकडे जाणारे सर्व रस्ते खोदून मैराळ-सावंगी ते धारासूर या रस्त्यावर चेकपोस्ट बसविण्याच्या सूचना तहसीलदार स्वरूप कंकाळ यांनी दिल्या आहेत.
गंगाखेड तालुक्यातील धारासूर शिव परिसरात खडका धरणाच्या खालील बाजूने वाळू उपसा करण्यासाठी वापरत असलेला तराफा जाळून नष्ट करताना तहसीलदार स्वरूप कंकाळ, मंडल अधिकारी शंकर राठोड, तलाठी अक्षय नेमाडे, रमेश मुलंगे, पोलीस पाटील जाधव, आदी दिसत आहेत.