विद्यार्थ्यांना बालवयापासून विज्ञानाची आवड निर्माण व्हावी, त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोण वाढीस लागावा या दृष्टीकोणातून शोध आणि विकास याची सांगड घालून त्यांच्या कल्पना शक्तीला वाव देणे, समजोपयोगी साधन निर्मिती करून दैनंदिन जीवनातील समस्यांचे निराकरण करण्यास प्रेरणा देणे यास उद्देशातून भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागामार्फत शालेय विद्यार्थ्यांसाठी इन्स्पायर अवार्ड देण्यात येतो. या अंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना १० हजार रुपयांची रक्कम त्याच्या बँक खात्यावर वैज्ञानिक उपकरणे तयार करण्यासाठी देण्यात येते. सद्यस्थितीत कोरोनाचा काळ असल्याने शाळा सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे ऑनलाईन नामांकन करणे ही बाबत सद्यस्थितीत शिक्षण विभागाला गैरसोयीची होती. परंतु, नियोजनबद्ध पद्धतीने शिक्षक, विद्यार्थी व पालक यांच्या समन्वयातून ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील ३६ विद्यार्थ्यांची इन्स्पायर अवार्डसाठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये परभणी, सेलू तालुक्यातील प्रत्येकी ८, गंगाखेड तालुक्यातील १, जिंतूर, पाथरी तालुक्यातील प्रत्येकी ४, मानवत तालुक्याील ७, पूर्णा तालुक्यातील ३ व पालम तालुक्यातील एका विद्यार्थ्याचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना वैज्ञानिक उपकरण तयार करून ते सादर करण्याची संधी मिळणार आहे.
सेलू तालुक्यात ८ विद्यार्थ्यांची निवड
सेलू तालुक्यात ऑनलाईन नोंदणी केलेल्या जिल्हा परिषद शाळेतील ७ व खाजगी शाळेतील १ अशा ८ विद्यार्थ्यांची इन्स्पायर अवार्ड स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या आठही विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात प्रत्येक १० हजार रुपये वैज्ञानिक उपकरण विकसित करण्यासाठी जमा करण्यात येणार असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी गणराज यरमळ यांनी दिली.
ग्रामीण भागातील बाल वैज्ञानिकांना वैज्ञानिक उपकरणे तयार करताना काही अडचणी आल्या तर त्या सोडविण्यासाठी विज्ञान पर्यवेक्षक व शिक्षकांना सूचना देण्यात आल्या आहेत. बालवैज्ञानिकांनी या संधीतून वैज्ञानिक दृष्टीकोण विकसित करावा.
गजानन यरमळ, गटशिक्षणाधिकारी, सेलू