परभणी : पोलिस चालक आणि शिपाई या दोन्ही पदांच्या शारीरिक चाचणी प्रक्रिया झाल्यावर चालक पदासाठी वाहन चाचणी परीक्षा शनिवारपर्यंत बीड येथे घेण्यात आली. या प्रक्रियेमध्ये एकूण ५५४ उमेदवारांना चाचणीकरिता बोलावण्यात आले होते. त्यापैकी ३७२ उमेदवार हे पुढील लेखी परीक्षेसाठी तात्पुरत्या स्वरूपात पात्र ठरले आहेत.
जिल्हा पोलीस दलातील पोलीस चालक आणि शिपाई अशा दोन्ही पदांच्या मिळून १४१ जागा भरल्या जाणार आहेत. त्यात शारीरिक चाचणी प्रक्रियेत शिपाई पदासाठी ३४९५ तर चालक पदासाठी २५३८ उमेदवार हजर होते. त्यातील पोलिस शिपाई पदासाठी एकास दहा प्रमाणे ११२९ उमेदवार पात्र झाले आहेत. शारीरिक चाचणी प्रक्रियेनंतर बीड येथे नऊ ते १३ जुलैपर्यंत उमेदवारांची वाहन चाचणी परीक्षा घेण्यात आली. या वाहन चाचणी परीक्षेमध्ये एकूण ५५४ उमेदवारांना बोलावण्यात आले होते. त्यापैकी ५१७ उमेदवार प्रत्यक्ष हजर होते तर ३७ उमेदवार गैरहजर होते. त्यामध्ये ३७२ उमेदवार हे पुढील लेखी परीक्षा प्रक्रियेस पात्र ठरले आहेत. यामध्ये १२ महिला आणि ३६० पुरुष उमेदवारांचा समावेश आहे.
सर्व उमेदवार लागले तयारीलालेखी परीक्षा पुढील वेळापत्रकानुसार होणार आहे. त्यानुसार शारीरिक चाचणी आणि वाहन चाचणी प्रक्रियेत सहभागी होऊन पुढील प्रक्रियेस पात्र ठरलेल्या उमेदवारांकडून लेखी परीक्षेच्या अनुषंगाने तयारी सुरू करण्यात आली आहे. भावी पोलिसांचे स्वप्न लेखी परीक्षा उत्तीर्ण केल्यावर सर्व गुणांच्या आधारावर पूर्ण होणार आहे.