लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील पाथरी रोडवरील शाहूनगरातील एका घरात लपून ठेवलेला ३१ किलो ७५० ग्रॅम गांजा स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने ९ सप्टेंबर रोजी जप्त केला आहे़ या प्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यात तिघांविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे़शाहूनगरातील पांडूरंग महादेव कसबे यांच्या राहत्या घरी गांजाचा साठा असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली़ या माहितीवरून उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन बगाटे यांच्या उपस्थितीत पांडूरंग कसबे याच्या घरी पथकाने छापा टाकला़ यावेळी दोन शासकीय पंचही सोबत होते़ यावेळी एका खोलीतील पलंगाखाली दोन प्रवासी बॅग आणि एका प्लास्टिकच्या बॅगमध्ये ३१़७५० किलो गांजा मिळून आला़ या गांजाची किंमत ९५ हजार २५० रुपये एवढी असल्याची माहिती पोलिसांनी दिली़ पांडूरंग कसबे याच्याकडे पोलिसांनी विचारणा केली असता, हा गांजा त्यांची मेहुणी शोभा उर्फ रुखसाना सलीम अन्सारी व धोंडाबाई विठ्ठल नेमाणे उर्फ धोंडाबाई लक्ष्मण शेळके यांनी अवैध विक्रीसाठी आणला असल्याचे सांगितले़ त्यानंतर या दोन्ही महिलांना बोलावून विचारपूस केली असता, विशाखापट्टणम् येथून रेल्वेतून हा गांजा आणल्याचे त्यांनी सांगितले़ तसेच भिवंडी येथील मुस्कानभाई यास तो विक्री करणार असल्याची माहिती दिली़ या प्रकरणी सपोनि आलेवार यांच्या फिर्यादीवरून नानलपेठ पोलीस ठाण्यात तिन्ही आरोपीविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे़ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन बगाटे यांच्या उपस्थितीत स्थागुशाचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे, सहायक निरीक्षक व्यंकटेश आलेवार, किशोर नाईक, मधुकर चट्टे, बालासाहेब तुपसुंदरे, हनुमंत जक्केवार, हरिश्चंद्र खुपसे, सय्यद मोईन, अरुण पांचाळ, पवार, मगर, कोरडे यांनी केली़
परभणी शहरात ३२ किलो गांजा पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 12:57 AM