परभणी : येथील बसस्थानकावरून एका महिलेचे ४ तोळ्यांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लांबविल्याची घटना ६ डिसेंबर रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. बसस्थानक भागात मागील दोन आठवड्यांमध्ये चोरीच्या तीन घटना घडल्या असून, इतरही किरकोळ घटनांमध्ये वाढ झाली आहे.
शहरातील राहुलनगर भागातील कोमल किरण मोरे या रविवारी दुपारी गावाकडे जाण्यासाठी येथील बसस्थानकावर आल्या होत्या. बसमध्ये चढत असतानाच चोरट्यांनी कोमल मोरे यांच्या बॅगमधील पर्स अलगद काढून घेतली. या पर्समधील ४ तोळे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लांबविले आहेत. भरदिवसा ही घटना घडली असून, त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, काही वेळाने चोरी झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर कोमल मोरे यांनी बसस्थानक परिसरात शोधाशोध केली; परंतु दागिन्यांचा शोध लागला नाही. त्यामुळे कोतवाली पोलीस ठाणे गाठून त्यांनी तक्रार नोंदविली आहे. याप्रकरणी गुन्हा नोंद झाला असून, पोलीस नाईक प्रल्हाद देशमुख या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
प्रसूतीसाठी आणलेल्या पैशावर डल्ला
शहरातील बसस्थानकावर शनिवारी सायंकाळी एका ज्येष्ठ नागरिकाच्या खिशातील नगदी ४० हजार रुपये चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली आहे. जिंतूर तालुक्यातील बोरी येथील नरहरी देवराव चौरे यांच्या सुनेची प्रसूती होणार असल्याने नरहरी चौरे हे ४० हजार रुपये घेऊन परभणी येथे आले होते. मात्र, प्रसूतीसाठी या रकमेची आवश्यकता भासली नाही. त्यामुळे शनिवारी सायंकाळच्या सुमारास चौरे गावाकडे जाण्यासाठी निघाले. बसस्थानकातच त्यांच्या खिशातील ४० हजार रुपयांच्या रकमेवर चोरट्यांनी डल्ला मारला. याप्रकरणी नरहरी चौरे यांनी सोमवारी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून गुन्हा नोंद झाला आहे. पोलीस कर्मचारी कोलमवाड तपास करीत आहेत.
सीसीटीव्ही नसल्याने चोरट्यांचे मनोधैर्य वाढले
परभणी बसस्थानकावर पूर्वी १८ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले होते. त्यामुळे चोरीच्या घटनांना चांगलाच आळा बसला होता. मात्र, सध्या हे बसस्थानक तात्पुरत्या शेडमध्ये चालविले जात असून, एकही सीसीटीव्ही कॅमेरा या ठिकाणी कार्यरत नाही. त्याचा फायदा उचलत चोरीच्या घटना वाढल्या आहेत. शनिवार आणि रविवार या दोन दिवसांत दोन चोरीच्या घटना घडल्या. यापूर्वीही बसस्थानकातून १ लाख रुपयांची रक्कम लांबविल्याची घटना घडली होती.